कारंजा (घा.) | 14 एप्रिल 2026
गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
कारंजा (घा.) येथील गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक आशिष मानकर, पर्यवेक्षक वसंत बारंगे, तसेच सहशिक्षिका प्रतिभा गोंडाणे, जयश्री चापले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री चापले यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. यावेळी शिक्षिका प्रतिभा गोंडाणे, सुवर्णा बारंगे आणि योगिता गुरवे यांनीही बाबासाहेबांच्या जीवनातील विविध घटनांवर प्रकाश टाकला.
या निमित्ताने शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचा समावेश होता. वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता सातवीची विद्यार्थिनी माही बेलखेडे आणि इयत्ता आठवीची विद्यार्थिनी धनश्री जती यांनी डॉ. आंबेडकर यांच्या समाजकार्य व भारतीय संविधानाविषयी प्रभावी विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ममता चोपडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.









