August 15, 2025 7:31 am

घराचा ताबा मिळवून देण्यासाठी मागितले होते 20 हजार रुपये

लाखणी पोलिस ठाण्यातील लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

भंडारा : नागपूर येथील एका रहिवाशाने लाखनी येथे खरेदी केलेल्या घराचा ताबा मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लाखनी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई १४ मे रोजी लाखनी येथे करण्यात आली. राजेश निलकंठराव भजने (वय ४९, रा. समर्थ नगर, लाखनी) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलिसाचे नाव आहे.
                           सदर तक्रारदार नागपूर जिल्ह्यात वास्तव्यास असून, त्यांनी २०१८ मध्ये लाखनी येथे एक घर खरेदी केले होते. मात्र, १७ एप्रिल रोजी एक महिला आणि तिच्या मुलाने घराचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा घेतला. यानंतर तक्रारदाराने लाखनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी १८ एप्रिल रोजी संबंधित महिला व तिच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला.
                            त्यानंतर, घराचा ताबा मिळवून देण्यासाठी पोलीस हवालदार राजेश भजने यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा यांच्याकडे तक्रारदाराने २२ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार झालेल्या पडताळणीत आरोपी हवालदाराने पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात ५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
                             लाच स्वीकृतीसाठी २७ एप्रिल कारवाईचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने आरोपीने लाच स्वीकारली नाही. अखेर १४ मे रोजी पोलिसांनी आरोपी भजने याला ताब्यात घेतले. यासंदर्भात लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या घराची झडती घेण्यात येत आहे. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून तपास सुरू आहे.
                             ही कारवाई पोलीस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय कुंजरकर आणि त्यांच्या पथकाने केली. भंडारा जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी स्वतः किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News