जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील : नितीन गडकरी
नागपूर : “घरची मुर्गी दाल बराबर, आणि बाहेरचं सावजी चिकन मसाला!” — आपल्या खास विनोदी पण टोचून बोलणाऱ्या शैलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या काही नेत्यांना थेट सुनावलं. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी पक्षातील ‘इनकमिंग’ राजकारणावर भाष्य करत, जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा दिला.
गडकरी म्हणाले, “भाजपमध्ये सध्या नव्या लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे. हे स्वागतार्ह आहे, पण ज्यांनी कठीण काळात पक्ष उभा केला, त्यांच्याकडे पाठ फिरवणं धोकादायक ठरेल.” यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंचावर उपस्थित होते. गडकरींनी त्यांच्याकडे पाहतच सूचकपणे म्हटलं, “बावनकुळे, जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, तेच आपल्या पक्षाचं खरं बळ आहेत.”
त्यांनी पुढे म्हटलं, “जर हे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले, तर पक्ष कितीही मोठा झाला तरी एका दिवसात खाली येऊ शकतो.” या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच कुजबुज सुरू झाली.
गडकरींनी उदाहरण देत सांगितलं की, “डॉ. राजीव पोतदार हे प्रामाणिक, निष्ठावंत आणि जनतेशी जोडलेले कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपलं वैद्यकीय काम बाजूला ठेवलं आणि लोकांसाठी दिवस-रात्र काम केलं. अशा कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे पक्षाचं नुकसान करणं होय.”
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने भाजपमध्ये नव्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. अशा पार्श्वभूमीवर गडकरींचं हे वक्तव्य म्हणजे तळागाळातील नाराज कार्यकर्त्यांना दिलासा आणि उच्च पातळीवरील नेत्यांना दिलेला अप्रत्यक्ष इशारा, असा दुहेरी अर्थ घेतला जात आहे.
शेवटी गडकरींनी ठाम शब्दांत सांगितलं — “राजकारणात पैसा किंवा प्रतिष्ठेपेक्षा निष्ठा, काम आणि जनतेशी संवाद हाच खरा पाया आहे. जुने कार्यकर्ते विसरलात, तर ज्या वेगाने वर जाल, त्याच वेगाने खालीही याल.”
त्यांच्या या थेट भाषणाने भाजपमधील अनेक नेत्यांचे कान टोचले गेले असून, आगामी उमेदवारीच्या समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.














Users Today : 0
Users Yesterday : 11