नितीन गडकरींच्या कार्यक्रमात महिला अधिकाऱ्यांमध्ये वाद
सोफ्यावर बसण्यावरून सुरू झालं भांडण, चिमटा-कोपऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार्यक्रमादरम्यान दोघींच्यातील किरकोळ वाद चांगलाच तापला आणि एकीने दुसरीला चिमटा काढल्याचा तसेच कोपरा मारल्याचा आरोप आहे.
ही घटना टपाल विभागातील पोस्टमास्टर जनरल (PMG) पदावरील अधिकाऱ्यांमध्ये घडली. शोभा मधले (केशरी साडी) आणि सुचिता जोशी (राखाडी साडी) अशी या दोघींची नावे आहेत. मधले यांची ८ सप्टेंबर रोजी कर्नाटकातील घरवाडा येथे बदली करण्यात आली होती. नवीन नियुक्ती होईपर्यंत नागपूर येथील जबाबदारी नवी मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र मधले यांनी बदली आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळवली. यामुळे दोघींमधील तणाव वाढला.
रोजगार मेळाव्यात एकाच सोफ्यावर बसताना दोघींच्यात वाद झाला. मधले यांनी जोशींना ढकलल्याने सोफ्यावर पाणी सांडले, त्यानंतर त्यांनी जोशींच्या हाताला चिमटा काढला आणि कोपरा मारल्याचा आरोप आहे.
गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, दोन्ही महिला अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाईची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. विभागीय पातळीवरही या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.










