ब्लँकेटसह मच्छरदाणीसह फरफटत नेले, गोंदियातील घटनेने खळबळ
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील धमदिटोला येथे पुन्हा एकदा वन्यजीव हल्ल्याची गंभीर घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. प्रभाबाई कोराम (वय 49) असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
व्हरांड्यात झोपलेल्या महिलेला फरफटत नेले
मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रभाबाई कोराम या आपल्या मुलीच्या गावी धमदिटोला येथे गेल्या होत्या. शनिवारी रात्री त्या घराच्या व्हरांड्यात झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, वाघाने मृत महिलेला ब्लँकेट आणि मच्छरदाणीसह फरफटत दूर नेले. रविवारी सकाळी ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वनविभागावर आपला तीव्र रोष व्यक्त केला.
गावकऱ्यांनी मृतक महिलेच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. वनविभागाच्या वतीने तातडीची मदत म्हणून कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली असून, उर्वरित सर्व मदत पुढील आठवड्याभरात दिली जाईल, असे आश्वासन वन अधिकाऱ्यांनी दिले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने या भागात त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वन्यजीवांकडून मानवी वस्तीत घुसून हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अवघ्या तीन दिवसांत गोंदिया आणि नाशिक जिल्ह्यात दोन गंभीर हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील संजयनगर येथे तीन दिवसांपूर्वी पाच वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना ताजी असतानाच, आता देवरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. या वाढत्या घटनांमुळे ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला असून, त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.













Users Today : 3
Users Yesterday : 11