“डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक” – प्रा. सागर भोवते

तिवसा | वार्ताहर | 14 एप्रिल 2026

“डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक” – प्रा. सागर भोवते

भारतीय घटनेचे शिल्पकार आणि शोषित, वंचित, दलित समाजाचे उद्धारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि लाभदायक असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन संघटनेचे प्रमुख प्रा. सागर भोवते यांनी केले.

ते श्रीक्षेत्र वरखेड येथील श्री माणिक वाचनालयात आयोजित “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विद्यार्थी जीवन” या विषयावरील कार्यक्रमात बोलत होते. डॉ. आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे वाचनालय अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक, आद्य ग्रामगीताचार्य श्री रामकृष्णदादा बेलूरकर यांनी स्थापन केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय नकलाकार हरिभाऊजी बेलूरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून शालिकराम तायडे, डॉ. नाकाडे, अभिजित बेलूरकर, गडलिंग, मनोहर तसेच माजी सरपंच लोणारे उपस्थित होते.

आपल्या भाषणात प्रा. भोवते यांनी डॉ. आंबेडकर हे देव नसून एक महामानव होते, असे सांगत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा उल्लेख केला. त्यांनी भारतीय समाजाला परिपूर्णतेकडे नेण्यासाठी केलेल्या कार्याची दखल देश-विदेशात घेतली गेली असल्याचेही नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वरखेड गावातील महिलांनी ‘बुद्ध वंदना’ सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. भारती बेलूरकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. वंदना हरणे यांनी तर आभार प्रदर्शन उद्धव बेलूरकर यांनी मानले.

या कार्यक्रमास गावातील युवक-युवती, महिला भगिनी तसेच वाचकवर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0
0

Leave a Reply

Realted News