दर्यापुरात हॉटेल तपासणीत 15 घरगुती सिलिंडर जप्त

दर्यापुरात हॉटेल तपासणीत 15 घरगुती सिलिंडर जप्त : कारवाईदरम्यान नायब तहसीलदारांशी धक्काबुक्की,    कागदपत्रे फाडून सिलिंडर पळवले

अमरावती : दर्यापूर शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हॉटेलांवर महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत १५ सिलिंडर जप्त केले. मात्र एका हॉटेलवर कारवाई सुरू असताना नायब तहसीलदार प्रमोद काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी धक्काबुक्की करण्यात आली. तसेच पंचनाम्याची कागदपत्रे फाडून जप्त केलेले काही सिलिंडरही पळवून नेण्यात आल्याची घटना घडली.

                         जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. इराण–इस्रायल तणावामुळे तेल व गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सिलिंडरच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

                          काल रविवार, रोजी दुपारी तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार प्रमोद काळे, सहाय्यक महसूल अधिकारी विनोद जाधव, मंडळ अधिकारी राजेश मिरगे तसेच तलाठी प्रदीप गिते आणि नांगरे यांच्या पथकाने दर्यापूर शहरातील नऊ आस्थापनांची तपासणी केली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे १५ सिलिंडर जप्त करण्यात आले.

                          दरम्यान, अंजनगाव टी-पॉईंट परिसरातील बाभळी टी-पॉईंटसमोरील ‘हॉटेल जम-जम’ येथे कारवाई सुरू असताना हॉटेलच्या संचालकांनी काही व्यक्तींना जमा करून अधिकाऱ्यांशी वाद घातला. यावेळी नायब तहसीलदार प्रमोद काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी धक्काबुक्की करण्यात आली तसेच पंचनाम्याची कागदपत्रे फाडून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला.

                           याच गोंधळात हॉटेल संचालक व त्यांच्या साथीदारांनी जप्त करून वाहनात ठेवलेले काही सिलिंडरही काढून पळवून नेले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

                            घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

0
0

Leave a Reply

Realted News