मोहप्यात जागतिक महिला दिन उत्साहात

मोहप्यात जागतिक महिला दिन उत्साहात;

कर्तृत्ववान महिलांचा गौरव, आत्मविश्वासाचा संदेश

का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर

मोहपा : जागतिक महिला दिनानिमित्त स्थानिक महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा गौरव करत स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. मोहपा नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या पुढाकारातून तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

                         कार्यक्रमात शहराची मान उंचावणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत विक्रीकर सहाय्यक आयुक्तपदी निवड झालेल्या कु. कोमल गुणवंत ढवळे तसेच मुंबई येथे यशस्वी उद्योजिका म्हणून कार्यरत असलेल्या शीतल अजय कुबडे (गणोरकर) यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या यशकथांनी उपस्थित महिलांना प्रेरणा दिली. 

                         मनोरंजनासोबत प्रबोधनालाही महत्त्व देत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविषयी विशेष व्याख्यानातून महिलांना त्यांच्या हक्कांबाबत आणि कायदेशीर उपाययोजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बचत गटांमार्फत उभारण्यात आलेल्या स्टॉलमधून महिलांच्या स्वावलंबनाची झलक पाहायला मिळाली.

                         ‘होम मिनिस्टर’सह विविध स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आत्मविश्वासाने आपले कौशल्य सादर केले. स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. सुकन्या रंगारी यांनी खेळांच्या स्पर्धेत ‘पैठणी’चा मान पटकावला, तर लकी ड्रॉमधून श्रद्धा चौधरी यांची निवड झाली.

                           कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती प्रीती प्रमोद मानमोडे यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. नगरसेविका शीतल श्याम खरबडे यांनी स्त्रीशक्तीच्या योगदानावर प्रकाश टाकला. नगराध्यक्ष माधव चर्जन यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

                           या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. शहर व परिसरातील महिलांनी पारंपरिक आणि आधुनिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महिलांसाठी संदेश : या कार्यक्रमातून महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकते, हा ठाम संदेश देण्यात आला. आपल्या हक्कांची जाणीव ठेवून समाजात सक्रिय सहभाग नोंदवणे आणि इतर महिलांनाही पुढे आणणे, हीच खरी महिला दिनाची प्रेरणा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

1
0

Leave a Reply

Realted News