दूध महागलं! अमूलकडून दरवाढ जाहीर; उद्यापासून ग्राहकांच्या खिशाला झळ
पशुखाद्य, पॅकेजिंग आणि वाहतूक खर्च वाढल्याने निर्णय; प्रति लिटर 2 रुपयांची वाढ लागू
नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा महागाईचा फटका बसणार असून, अमूल कंपनीने दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमूलच्या विविध दूध पॅकेट्सच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली असून, ही नवीन दरवाढ 14 मेपासून देशभर लागू होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पशुखाद्य, पॅकेजिंग साहित्य तसेच वाहतूक खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळेच ही भाववाढ करावी लागत असल्याचे अमूल कंपनीने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि दूध उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले.

कोणते दूध किती रुपयांना मिळणार?
दरवाढीनंतर अमूल गोल्ड (फुल क्रीम) दूध 500 मिली पॅकेटसाठी 35 रुपये तर प्रति लिटर 67 रुपयांना उपलब्ध होणार आहे. अमूल ताझा (टोन्ड) दूध 500 मिलीसाठी 30 रुपये आणि प्रति लिटर 58 रुपये दराने विकले जाईल. अमूल गाईचे दूध 500 मिली पॅकेटसाठी 31 रुपये दराने मिळणार असून, अमूल म्हशीचे दूध 500 मिलीसाठी 38 रुपयांना उपलब्ध राहील.
दरम्यान, GCMMF च्या माहितीनुसार ही दरवाढ प्रमुख दूध पॅकेट्सवर लागू करण्यात आली असून, एकूण वाढ 2.5 ते 3.5 टक्क्यांच्या दरम्यान आहे. उत्पादन, संकलन, प्रक्रिया आणि वितरण खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0