♦ मी व्यवस्थित परत येईन; शहीद जवान मुरली नाईक यांनी आईला दिले होते आश्वासन
मुंबई : “देशाला माझी गरज आहे. ते माझे कर्तव्य आहे. मला जायलाच हवे. मी व्यवस्थित परत येईन”, असे आश्वासन महाराष्ट्राचा शहीद जवान मुरली नाईक यांनी आपल्या आईला व्हिडिओ कॉलवर दिले होते. हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच हा व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. परंतु नियतीने घात केला, पाकिस्तानी सैन्याचे हल्ले उधळून लावताना जवान मुरली नाईक यांना वीरमरण आले. यामुळे मुरली नाईक यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर पसरले आहे.
जवान मुरली नाईक यांना 9 मे रोजी उरी येथे पाकिस्तानी सैन्यासोबत लढताना वीरमरण आले. ही बातमी कळताच मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. हल्ला होण्याच्या काही तासांपूर्वीच मुरली नाईक यांनी आपल्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉल केला होता. तेव्हा त्यांनी आपल्या आईला आश्वासन दिले होते की, “देशाला माझी गरज आहे. ते माझे कर्तव्य आहे. मला जायलाच हवे. मी व्यवस्थित परत येईन”, परंतु नियतीने घात केला. मुरली नाईक यांचे वडील हे मजूर असून त्यांनी माझा मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला, याचा मला अभिमान आहे, असे म्हटले आहे. मात्र पोटचा गोळा गमावल्याने आईच्या अश्रूंना बांध राहिला नाही.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुरली नाईक यांच्या मूळ गावी अंत्यदर्शनसाठी जाणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांनी शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांचा बळी घेऊन हिंदू मायभगिनींचे सौभाग्यलेणे हिरावून घेणाऱ्या कट्टरपंथी अतिरेक्यांच्या क्रौर्याचा बदला घेऊन मायभूमीच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणाऱ्या मुरली नाईक या जवानाला वीरगती प्राप्त झाली.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, देश आणि धर्मासाठी लढणाऱ्या मुरलीच्या कुटुंबाशी आमच्या पक्षाचे नाते होते. त्यांच्या निधनामुळे आमच्या पक्षपरिवारातला हिरा हरपला आहे. हे दुःख पेलण्याची शक्ती त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांना मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. मुरलीच्या आत्म्यास सद्गती मिळेलच. या कुटुंबाची भेट मी घेणार आहेच, पण त्यांचे सांत्वन करताना माझे शब्द जडावतील.