कळमेश्वर तालुका काॅंग्रेसची सरसकट कर्जमाफीची मागणी

कळमेश्वर तालुका काॅंग्रेसचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन

 ओल्या दुष्काळाची नुकसानभरपाई आणि सरसकट कर्जमाफीची मागणी

कळमेश्वर (जि. नागपूर) – तालुक्यात गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या अतिवृष्टी, वादळ आणि ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाची तातडीने घोषणा करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, अशी मागणी करणारे निवेदन तालुका काॅंग्रेसने कळमेश्वर तहसीलदार विकास बिक्कड यांना दिले आहे. हे निवेदन तहसिलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे.

                          या निवेदनात सांगण्यात आले आहे की, अतिवृष्टीमुळे संत्रा, कपाशी, सोयाबीन, तूर यासारख्या मुख्य पिकांबरोबरच भाजीपाला व फळझाडांचेही मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यांना आणि राहत्या घरांनाही याचा फटका बसला आहे. या सर्व गोष्टीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला असून, शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाले आहेत.
                          बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरी यांचे वाढते दर आणि शेतमालाला मिळणारा अल्प भाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालले आहेत. त्यामुळे शासनाने तालुक्यात सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच पंचनाम्यासाठी कोणतीही मुदत अथवा बंधने लागू करू नयेत, अशी मागणीही यामध्ये नमूद आहे.

                          निवेदन देणाऱ्यांमध्ये काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक भागवत, बाबाराव कोढे, आशिष देशमुख,  श्रावण भिंगारे, महेेंद्र डोंगरे,राजेश श्रीखंडे, अमोल फुलारे, श्रीराम धोटे, नरेंद्र पालटकर, विजय भांगे, ज्ञानेश्वर काळे, काशीराव भक्ते, प्रविण राउत, प्रभाकर रानडे, धर्मराज आसोले, संजय तभाने, वासुदेव गोतमारे, चेतन निंबाळकर, मोहीत गिरी, पियुष मानकर, विनोद राउत, नरेष गोतमारे, विरेंद्र पांडे इ. सह मोठया संख्येने काॅंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0
0

Leave a Reply

Realted News