नागपूर विधान परिषद निवडणूक : कोट्यधीश उमेदवारांमध्ये चुरस

नागपूर विधान परिषद पोटनिवडणूक : पोतदार विरुद्ध लोंढे सामना निश्चित

नागपूर, प्रतिनिधी : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपकडून डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली असून, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर या जागेचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. भाजपमध्ये अनेक इच्छुक असतानाही पक्षश्रेष्ठींनी डॉ. पोतदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

महाविकास आघाडीत उमेदवारीबाबत शेवटपर्यंत खल सुरू होता. अखेर काँग्रेसने अतुल लोंढे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, मतदारसंघातील संख्याबळ पाहता भाजपचे पारडे जड मानले जात आहे.

एकूण ८२६ मतदारांपैकी भाजपकडे ५२०, तर महायुतीकडे ५५९ मते आहेत. त्याउलट महाविकास आघाडीकडे केवळ २०० मते आहेत. त्यामुळे डॉ. राजीव पोतदार यांचा विजय सुकर मानला जात आहे.

या पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराला १ जानेवारी २०२८ पर्यंत, म्हणजे सुमारे १९ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.

नागपूर विधान परिषद निवडणूक : कोट्यधीश उमेदवारांमध्ये चुरस
संपत्तीत डॉ. राजीव पोतदार आघाडीवर; वार्षिक उत्पन्नात अतुल लोंढे सरस

नागपूर, प्रतिनिधी : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमुळे विदर्भातील राजकीय वातावरण तापले असून, ही निवडणूक आता उमेदवारांच्या आर्थिक स्थितीमुळेही चर्चेचा विषय ठरली आहे. भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे हे दोघेही कोट्यधीश असून, निवडणूक प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्ती व उत्पन्नाची माहिती समोर आली आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार, भाजपचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार हे या निवडणुकीतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्याकडे एकूण ३८ कोटी ५७ लाख रुपयांची मालमत्ता असून, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत तब्बल ११५ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१९ मध्ये त्यांची एकूण मालमत्ता १७ कोटी ८९ लाख रुपये होती.

डॉ. पोतदार यांच्या मालमत्तेमध्ये १४ कोटी ६ लाख रुपयांची चल संपत्ती आणि २४ कोटी ५१ लाख रुपयांची अचल संपत्ती समाविष्ट आहे. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असल्याने आणि स्थावर मालमत्तेच्या मूल्यात झालेल्या वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे मानले जात आहे.

 

दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांच्याकडे सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता आहे. एकूण संपत्तीच्या बाबतीत ते पोतदार यांच्या तुलनेत मागे असले तरी वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत त्यांनी आघाडी घेतली आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार, डॉ. राजीव पोतदार व त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १० लाख ९३ हजार रुपये आहे, तर अतुल लोंढे व त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३८ लाख ३१ हजार रुपये इतके आहे.

दरम्यान, दोन्ही उमेदवार अनेक वर्षांपासून राजकारण व विविध आंदोलनांमध्ये सक्रिय राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रत्येकी दोन असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे राजकीय स्वरूपाचे असून संबंधित प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.

आर्थिक ताकद, राजकीय प्रतिष्ठा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवरील प्रभाव या सर्व बाबी लक्षात घेता नागपूर विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


3
0

Leave a Reply

Realted News