नाशिक : अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नी कल्पना खरात फरार

अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नी कल्पना खरात फरार, SITचा तपास वेगात

नाशिक : नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. खरात यांची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून तिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) सक्रिय झाले आहे. दोन दिवसांनंतरही ती सापडली नसल्याने तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

तपासाचा भाग म्हणून SITने खरात कुटुंबीयांची चौकशी तीव्र केली आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याची पुन्हा चौकशी करण्यात आली असून, कल्पनाचे दोन्ही भाऊ यांनाही विचारपूस करण्यात आली आहे. याचदरम्यान, SITचे पथक सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील कल्पना खरातच्या माहेरी पोहोचले.

माहेरी झालेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कल्पना खरात गेल्या सुमारे 16 वर्षांपासून माहेराशी संपर्कात नव्हती. तसेच, अशोक खरात तिला माहेरी येऊ देत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती साधी असून ते अल्पशेतीवर उदरनिर्वाह करत असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. शिर्डी परिसरात जमीन खरेदी व्यवहारात कल्पना खरातने एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात SITने पुन्हा हर्षवर्धन खरातची चौकशी केली. तपासात या व्यवहारात कल्पना आणि तिच्या भावांचा आर्थिक संबंध असल्याचेही समोर आले आहे.

याशिवाय, अशोक खरातशी संबंधित ‘शिवनिका संस्थान’च्या तीन संचालकांचीही SITकडून चौकशी करण्यात आली आहे. इशान्येश्वर मंदिराशी संबंधित या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, या संचालकांचा खरातच्या आर्थिक व्यवहारांशी संबंध असल्याचे प्राथमिक पुरावे समोर आले आहेत.

महिलांची फसवणूक आणि धार्मिक विधींच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचे आरोप आधीच असताना, आता आर्थिक गैरव्यवहारांचाही तपास अधिक गडद होत आहे. कल्पना खरात अद्याप फरार असल्याने आणि तपासाचा विस्तार नातेवाईकांपासून संस्थात्मक संबंधांपर्यंत वाढल्याने, या प्रकरणात पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

0
0

Leave a Reply

Realted News