February 7, 2026 8:39 am

नाशिक तपोवन : वृक्षतोड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले

वृक्षतोड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले;

अंजली दमानिया यांचा गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल

मुंबई/नाशिक : नाशिकच्या तपोवन परिसरातील सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, या वादाला आता राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी साडेबारा हजारांहून अधिक झाडे तोडण्यात आल्याचे महापालिकेने जाहीर केल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट हल्ला चढवित जोरदार टीका केली आहे.

तपोवन परिसरातील साधूग्राम प्रकल्पामुळे संभाव्य वृक्षतोडीवरून आधीच वाद सुरू असताना, महापालिकेच्या नव्या खुलास्यामुळे चर्चेला अधिक उधाण आले आहे. अंजली दमानिया यांनी सरकार आणि स्थानिक प्रशासनावर निशाणा साधत, “राज्यभरातून विरोध होत असतानाही नाशिकमधील झाडे तोडण्याची गिरीश महाजन यांना इतकी मस्ती आली आहे की आंदोलन झाले तरी काही फरक पडत नाही,” असे कठोर शब्दांत म्हटले. त्यांनी नागरिकांना आवाहन करत अशा वृत्तीच्या नेत्यांना राजकारणातून बाहेर फेकण्याची मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पर्यावरणाच्या मुद्यावर सरकारवर पुन्हा टीकेची झोड उठली आहे.

महापालिकेच्या अहवालानुसार पंचक, चेहडी, आगार टाकळी आणि तपोवन येथील चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी एकूण 1,728 झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. त्यापैकी 458 झाडे वाचविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. उर्वरित 270 झाडांची तोड करण्यात आली असून, त्याच्या बदल्यात 1 कोटी 76 लाख रुपयांचा पर्यावरणीय भरपाई निधी जमा करण्यात आला आहे. हा निधी पुढील पर्यावरण संवर्धन प्रकल्पांसाठी वापरण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच फाशीच्या डोंगर परिसरात 17,680 झाडांची नव्याने लागवड करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

File Photo
File Photo

दरम्यान, तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे सुमारे 1,800 झाडे तोडली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, यामुळे नाशिकमध्ये विरोध अधिक तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीची घोषणा केली आहे. गिरीश महाजन यांनी दक्षिण भारतातील राजमुद्री येथे जाऊन विशेष देशी प्रजातींच्या झाडांची निवड केली असून, सुमारे 15 फूट उंचीची 15 हजार झाडे टप्प्याटप्प्याने नाशिकमध्ये दाखल होत आहेत. या झाडांच्या देखभालीसाठी ठिबक सिंचन, जैविक खत आदी व्यवस्था करण्यात आल्याचे उद्यान विभागाने सांगितले आहे.

सोमवारपासून गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या विशेष वृक्षलागवड मोहिमेला सुरुवात होणार आहे. मात्र एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि दुसऱ्या बाजूला वृक्षलागवड, यामुळे शहरात संभ्रमाचे वातावरण आहे. पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे की लागवड महत्त्वाची असली तरी प्रौढ झाडांची तोड ही पर्यावरणासाठी मोठी हानीकारक आहे. अंजली दमानिया यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा वाद अधिक चिघळला असून, येत्या काळात या प्रश्नावर राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

File Photo
File Photo
0
0

Leave a Reply

Realted News