महिलांनो जागृत व्हा :
‘महिला सुरक्षा व सक्षमीकरण’ विषयावर महाविद्यालयात मार्गदर्शन
का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर
मोहपा – बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा येथे दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी ‘महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मोहपा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत खोब्रागडे उपस्थित होते.
खोब्रागडे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध सरकारी योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया विद्यार्थिनींना समजावून सांगितली. महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे सारखे प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात मोहपा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती शोभाताई कऊटकर यांनी कथा, कादंबरी आणि ग्रामगीता या साहित्याची माणसाच्या वास्तव आयुष्यातील भूमिका विद्यार्थ्यांसमोर उदाहरणांसह मांडली.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अलका थोडगे होत्या. “आपली प्रगती आणि संरक्षण हे आपल्या स्वतःच्या हातात आहे. दुसरा कोणी येऊन ती जबाबदारी पार पाडणार नाही,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला. डॉ. प्रमोद वडते यांनी कार्यक्रमाबाबत शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला डॉ. धनंजय देवते, डॉ. संजय ठवळे, प्रा. सचिन काळे, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. सिद्धार्थ चनकापुरे, प्रा. पवन उमप, प्रा. शुभम वाघ, श्रीमती कल्पना देवळे, श्री. हरीश अंजनकर, श्रीमती रजनी अकर्ते, प्रदीप बगडे, अरविंद डहाट, प्रकाश कोकोडे यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विनोद भालेराव यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. अनिता गणोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. लिलाधर खरपुरिये यांनी मानले.










