तरुणींना आधी व्यायामाच्या टिप्स, नंतर अर्धनग्न फोटोची मागणी!
‘नकारात्मक ऊर्जा’ दूर करण्याच्या नावाखाली तरुणींना जाळ्यात ओढल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत
पुणे : पुण्यात कथित अध्यात्मिक गुरूच्या नावाखाली तरुणींशी संपर्क साधून त्यांच्याकडून अर्धनग्न फोटो मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शरीरातील ‘नकारात्मक ऊर्जा’ दूर करण्याच्या नावाखाली तरुणींना व्यायामाच्या टिप्स देत विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर अर्धनग्न फोटो मागायचा, असा आरोप या प्रकरणातील आरोपीवर करण्यात आला आहे. फोटो देण्यास नकार दिल्यास भीती दाखवली जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दिव्य जितेंद्र परमार (वय २३) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. एका २२ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. आरोपीकडून मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्यातील मेसेज, फोटो आणि व्हिडिओंची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.
सोशल मीडियावरून तरुणींशी संपर्क
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कॉलेजमध्ये असताना स्वतःची ओळख ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ म्हणून करून देत होता. सोशल मीडियावर त्याने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला होता. तसेच सोशल मीडिया चॅनेलच्या माध्यमातूनही तो तरुणांशी आणि तरुणींशी संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपी सोशल मीडियावरून विशेषतः तरुणींशी संपर्क साधत असे. स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणून सादर करत त्यांच्याशी संवाद वाढवायचा. त्यानंतर व्यायामाच्या माध्यमातून शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करत असल्याचा आरोप आहे.
विश्वास संपादन केल्यानंतर अर्धनग्न फोटोची मागणी?
तक्रारीनुसार, तरुणीशी विश्वासाचे नाते निर्माण झाल्यानंतर आरोपीकडून मोबाईलवर अर्धनग्न फोटो मागवले जात होते. फोटो देण्यास नकार दिल्यास भीती दाखवली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे घाबरलेल्या एका पीडित तरुणीने अखेर कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
मोबाईल-लॅपटॉपमधून आणखी धक्कादायक माहिती समोर येणार?
आरोपीच्या मोबाईल फोन आणि लॅपटॉपची पोलिसांकडून तपासणी सुरू असून, त्यामध्ये आढळणारे फोटो, व्हिडिओ, संदेश आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. आरोपीने आणखी किती तरुणींशी अशा प्रकारे संपर्क साधला होता, तसेच आणखी कोणी या प्रकाराला बळी पडले आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अटक झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागरिकांनी भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडिया किंवा प्रत्यक्ष संपर्कातून स्वतःला अध्यात्मिक गुरू, उपचारक, मोटिव्हेशनल स्पीकर किंवा विशेषतः कोणत्याही व्यक्तीने उपचार, अध्यात्म, ऊर्जा किंवा अन्य कारण सांगून ‘विशेष शक्ती’ असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये.
दोष सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा व्हावी
तरुणींच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांना मानसिक दबावाखाली आणणाऱ्या आणि खासगी छायाचित्रांचा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्तींना आळा बसणे गरजेचे आहे. अशा गंभीर प्रकरणांची जलदगती (Fast Track) न्यायालयात सुनावणी होऊन, आरोप सिद्ध झाल्यास दोषींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून होणे स्वाभाविक आहे.










