प्रसिद्ध पुरोहित मंदार रानडे यांची निर्घृण हत्या; आरोपीला काही तासांत अटक

आंतरजातीय विवाहाचे पौरोहित्य ठरले मृत्यूचे कारण!

मुलीच्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून रचला हत्येचा कट; लग्नाचे काम असल्याचे सांगून बोलावले, मिरचीपूड फेकून कोयत्याने संपवले जीवन!

इचलकरंजी / सदलगा : आंतरजातीय प्रेमविवाहाचे पौरोहित्य केल्याच्या रागातून इचलकरंजी येथील प्रसिद्ध ज्योतिषी व पुरोहित मंदार अजित रानडे (वय ३५) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मानकापूर शिवारातील उसाच्या शेतात ३१ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह आढळला होता. कर्नाटकातील सदलगा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपी दीपक उर्फ बाबूसाहेब अण्णा मगदूम (वय ४५, रा. शिरदवाड) याला काही तासांतच अटक केली.

पोलिस तपासानुसार, आरोपीच्या १९ वर्षीय मुलीने १३ जानेवारी २०२६ रोजी शिवनाकवाडी येथील तरुणाशी आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहाचे पौरोहित्य करण्यासह लग्न जुळवून आणण्यात मंदार रानडे यांनी मदत केली होती. त्यामुळे समाजात आपली बदनामी झाल्याचा राग मनात धरून आरोपीने त्यांच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हत्येच्या दिवशी आरोपीने नवीन विवाहाचे काम असल्याचे सांगून अनोळखी क्रमांकावरून रानडे यांना मानकापूर शिवारात बोलावले. तेथे पोहोचताच त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकून त्यांना असहाय्य केले आणि धारदार कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी पसार झाला.

घटनेचे गांभीर्य ओळखून बेळगाव जिल्हा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सदलगा पोलिसांनी विशेष पथक तयार केले. तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक विश्वनाथ चौगुले आणि उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली यांच्या पथकाने आरोपीला शिरदवाड येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून हत्येसाठी वापरलेला रक्ताने माखलेला कोयताही जप्त करण्यात आला आहे. केदार कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून सदलगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

0
0

Leave a Reply

Realted News