नागपूर : संरक्षण क्षेत्राला स्फोटके आणि शस्रात्रे पुरविणाऱ्या तसेच सुमारे ३० देशांना निर्यात करणाऱ्या सोलर ग्रुपच्या बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड या आयुध निर्माणीत बुधवारी मध्यरात्री १२.३४ वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटात मयूर गणवीर (वय २५) ठार झाला होता. दरम्यान शनिवारी नागपुरातील दंदे हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार घेत असलेल्या चार कामगारांपैकी निकेश इरपाची याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान कंपनी सध्या बंद ठेवण्यात आली असून कंपनी व्यवस्थापनातर्फे मृतक कामगारांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत जाहीर करण्यात आली नसल्याचे समजते.
जखमींमध्ये हिमांशु पंचभाई, सिद्धार्थ डोंगाने, प्रभात जयश्रा, सचिन सरोदे, रविंद्र मिश्रा, योगेंद्र सिंग, सन्नी कुमार, सुरेश डोसेवार, अरूण कुमार, सुरज बिटने, बादल माणिकपुरे, प्रतिक तिवारी, निरजकुमार सातरघाडगे, आशिष तुमडाम, प्रेम सिंग, देवानंद रेवतकर, चंद्रेश भारती, रोहित चांगदेकर, निकेश इरपाची आदींचा समावेश आहे. त्यांच्यावर नागपुरातील रविनगर चौकातील दंदे हाॅस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. यापैकी सुरज कुमार, निकेश इरपाची, प्रभात जयश्रा व योगेंद्र सिंग हे आयसीयूत असून दोघे अत्यवस्थ असल्याने डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याची माहिती दंदे हॉस्पिटलने दिली आहे.
स्फोटाआधी फायर झाल्याने कामगारांना प्लांटच्या बाहेर पडण्यास वेळ मिळाला. हा स्फोट इतका भीषण होता की बाजारगावसह शिवा, सावंगासह नजीकच्या १० गावांना हादरे बसले. स्फोटाच्या आवाजाने भीतीमुळे हजारो नागरिक घराबाहेर पडले होते. कंपनीची लाखो रूपयांची उपकरणे आणि साहित्य जळून खाक झाले आहे. स्फोट झाला त्यावेळी रात्री ११ नंतरच्या शिफ्टमधील कामगार वेगवेगळ्या यूनिटमध्ये काम करीत होते. हे सर्व कामगार स्फोट झालेल्या इमारतीच्या २०० मीटर परिसरात असलेल्या प्रयोगशाळेत काम करीत होते.