तरुणाची स्वतःचा गळा चिरून आत्महत्या
तरुणी आयसीयूमध्ये, प्रकृती चिंताजनक
लालबाग परिसरातील थरारक घटना
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या लालबाग-काळाचौकी परिसरात आज शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. ब्रेकअपनंतर मानसिक तणावात असलेल्या 24 वर्षीय तरुणाने आपल्या माजी प्रेयसीवर दिवसाढवळ्या चाकूने जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव सोनू बराय (वय 24) असे असून तो आंबेवाडी परिसरात राहत होता. त्याचे त्याच भागातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते. तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात ब्रेकअप झाले होते.
या घटनेनंतर सोनू मानसिक तणावात होता आणि पुन्हा एकदा संबंध सुधारण्यासाठी तो प्रयत्न करत होता. शुक्रवारी सकाळी त्याने संबंधित तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि संतापाच्या भरात सोनूने तिला मारहाण केली. बचावासाठी तरुणी धावत आस्था नर्सिंग होममध्ये गेली, मात्र सोनूने तिचा पाठलाग करून आतमध्येच तिच्यावर चाकूने हल्ला केला.
या वेळी नर्सिंग होममधील कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत सोनूला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सोनूने स्वतःच्या गळ्यावर चाकू फिरवून आत्महत्या केली.
तत्काळ जखमी तरुणी आणि सोनू या दोघांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोनूचा मृत्यू झाला, तर तरुणी आयसीयूमध्ये असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिस ठाण्याचे अधिकारी तसेच उपायुक्त आर. रागसुधा घटनास्थळी पोहोचले. नर्सिंग होममध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.













Users Today : 3
Users Yesterday : 11