मुख्यमंत्री रोजगार योजनेतील सबसिडीसाठी १५,००० ची लाच
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा कनिष्ठ सहाय्यक रंगेहाथ पकडला
भंडारा, १६ ऑक्टोबर २०२५ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा पथकाने गुरुवारी वर्षातील आठवी यशस्वी कारवाई करत कनिष्ठ सहाय्यकाला १५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, भंडारा येथे कार्यरत असलेले कनिष्ठ सहाय्यक रत्नघोष ऋषींजी हुमणे (वय ४२) यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या लाभार्थीच्या कागदपत्रांची पूर्तता करून सबसिडी मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे ३०,००० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर त्यांनी पहिला हप्ता म्हणून १५,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
तक्रारदाराने लाच न देता १५ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. खात्री झाल्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी सापळा रचण्यात आला. त्या सापळ्यात आरोपीने लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
आरोपीकडून लाचेची रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्याच्या घरझडतीची कारवाई सुरू आहे. भंडारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.











