भोंदू खरात प्रकरणावरून पुण्यात महिला काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन
चाकणकरांच्या अटकेची मागणी
पुणे : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून, पुणे शहर महिला काँग्रेसने फर्ग्युसन कॉलेज रोडवर ‘जोडे मारो’ आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला. संबंधित मंत्र्यांची चौकशी करावी आणि माजी महिला आयोग अध्यक्षा Rupali Chakankar यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा Swati Shinde यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी शिंदे यांनी आरोप केला की, चाकणकर यांनी महिलांच्या सन्मानाशी खेळ केला असून, हा गंभीर व अक्षम्य गुन्हा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन तसेच महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याला संरक्षण दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी स्वाती शिंदे म्हणाल्या की, “महाराष्ट्रातील ‘एपस्टीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाची ३० दिवसांत सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या मंत्र्यांवरही तातडीने कारवाई व्हावी.”

आंदोलकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसकडेही मागणी करण्यात आली की, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या पक्षाने Rupali Chakankar यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून त्वरित हटवावे.

फर्ग्युसन कॉलेज रोडवरील या आंदोलनात ‘मंत्र्यांनो खुर्च्या खाली करा’, ‘भोंदूबाबा खरातला कडक शिक्षा द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्या प्रतिमांना जोडे मारून संताप व्यक्त केला.
या आंदोलनात अर्चना शाह, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, रेखा जैन, अंजली सोलापूरे, राजश्री दामले-चव्हाण, रूपाली पवार, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, अंजली देसाई, सुवर्णा माने, सुरेखा मारणे, गीतांजली यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0