February 7, 2026 8:38 am

मुंबईच्या रक्षणासाठी लढा आवश्यक – विजय वडेट्टीवार

मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरू

मुंबईच्या रक्षणासाठी लढा आवश्यक – विजय वडेट्टीवार

नागपूर | प्रतिनिधी
महाराष्ट्रावर आणि विशेषतः मुंबईवर अतिक्रमण सुरू असून मुंबई बळकावण्याचा आणि तिला गुजरातच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी आणि तिचे रक्षण करण्यासाठी लढा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. मुंबईतील जमिनी गिळंकृत करण्याचे काम सुरू असून मुंबईवर गुजरातचे नियंत्रण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे, असे ते म्हणाले. मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीच्या रक्षणासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येत असल्याबाबत त्यांनी स्वागत केले. कुटुंब एकत्र येत असेल तर तो आनंदाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांसोबत निवडणूक लढण्याची होती, मात्र मनसेसोबत जाण्याची काँग्रेसची तयारी नसल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला धक्का नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मित्रपक्ष वेगवेगळे लढत असले तरी त्यामुळे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला कोणताही धक्का बसणार नाही, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या पातळीवर लढवल्या जातात आणि त्यातील निर्णय स्थानिक स्तरावर घेतले जातात, असे ते म्हणाले.

काँग्रेस हा पक्ष जातीयवाद किंवा धर्मवाद करत नसून संविधानावर विश्वास ठेवणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकांत विकासासाठी काँग्रेसच्या पाठीशी जनतेने उभे राहावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.

0
0

Leave a Reply

Realted News