१२ कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात नागपूर झेडपीचा माजी शिक्षणाधिकारी अटकेत

शिक्षण खात्याला काळीमा : १२ कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात नागपूर झेडपीचे माजी शिक्षणाधिकारी अटकेत

बनावट शिक्षक, खोटे आयडी, सरकारी तिजोरीवर डल्ला; २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

नागपूर :  राज्यातील शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ वेतन प्रणाली घोटाळ्यात मोठा धक्का देणारी कारवाई करत विशेष तपास पथकाने (SIT) नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रविंद्र शंकरराव काटोलकर यांना अटक केली आहे. या घोटाळ्यातून १२ कोटी ३ लाख रुपयांचा सरकारी निधी लाटल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

                        शासनाच्या शालार्थ ऑनलाइन वेतन प्रणालीचा गैरवापर करत अस्तित्वात नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन काढण्यात आले. तपासात बनावट शालार्थ आयडी, खोटे ड्राफ्ट आणि फसव्या कागदपत्रांचा वापर झाल्याचे उघड झाले असून, या प्रकरणाने संपूर्ण शिक्षण खात्यात खळबळ उडाली आहे.

माहिती असूनही मंजुरी; पदाचा गैरवापर

                        २०२१ ते २०२२ या कालावधीत शिक्षणाधिकारी असताना काटोलकर यांनी बोगस शिक्षक व बनावट नोंदींची कल्पना असूनही कोणतीही चौकशी न करता वेतन प्रस्ताव मंजूर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर करत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे.

२६ जण आधीच अटकेत

                         या हायप्रोफाइल घोटाळ्यात आतापर्यंत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, लिपिक, मुख्याध्यापक, संस्था संचालक व शिक्षकांसह २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले असून, घोटाळ्याची व्याप्ती अधिक मोठी असल्याचे संकेत मिळत आहेत.

                          मंगळवारी अटक केल्यानंतर काटोलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या तपासादरम्यान आणखी वरिष्ठ अधिकारी व लाभार्थी अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

0
0

Leave a Reply

Realted News