भुलेश्वरमध्ये आगमन सोहळ्यात दुर्घटना
जखमींमध्ये ५ आणि ७ वर्षांच्या दोन मुलींचा समावेश
मुंबई : मुंबईतील भुलेश्वर परिसरात शनिवारी रात्री गणेशमूर्ती आगमन सोहळ्यादरम्यान भीषण दुर्घटना घडली. ‘भुलेश्वरचा राजा’ या सुमारे २२ फूट उंच गणेशमूर्तीला मंडपात नेत असताना अचानक मूर्ती कोसळली. मूर्ती अंगावर पडल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले.
ही घटना रात्री सुमारे १० वाजता जय आंबे चौक येथे घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि महापालिकेची पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृतांमध्ये दोन तरुणांचा समावेश
या दुर्घटनेत संकेत नेवशे (३३) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (३०) यांचा मृत्यू झाला. तर वैभव घेनंद (३८), पवन चौरसिया (२५), लावण्या गनेर (५), दिव्या गनेर (७) आणि कुणाल काशिद (२६) हे जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.

आगमन सोहळ्यातच दुर्घटना
गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील विविध गणेश मंडळांकडून भव्य आगमन मिरवणुका काढल्या जातात. ढोल-ताशे, संगीत आणि आकर्षक सजावटीसह मोठ्या मूर्ती मंडपात आणल्या जातात. याच आगमन सोहळ्यादरम्यान भुलेश्वरमध्ये ही दुर्घटना घडली.
मुंबईत हजारो सार्वजनिक गणेश मंडळे
यंदा महाराष्ट्रात १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मुंबईत सुमारे १०,६०० सार्वजनिक गणेश मंडळे असल्याची माहिती आहे. त्यापैकी सुमारे २,५०० मंडळांनी १० दिवसांच्या उत्सवासाठी परवानगी घेतली आहे. राज्यात यंदा सुमारे २८ लाख गणेशमूर्तींची स्थापना होण्याचा अंदाज आहे.
मुंबई महापालिकेने गणेश मंडपांच्या परवानगीसाठी ऑनलाइन सिंगल-विंडो प्रणाली सुरू केली आहे. या माध्यमातून महापालिका, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांची एनओसी मिळवण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.
मोठ्या मंडळांकडून आकर्षक थीम
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबईतील विविध मंडळांनी आकर्षक आणि भव्य थीमची तयारी केली आहे. अंधेरीचा राजा येथे अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारली जाणार आहे, तर काही मंडळांनी सुपरहिरो आणि इतर आगळ्यावेगळ्या संकल्पनांवर आधारित सजावटीची तयारी केली आहे.









