वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत साजरी केली प्रदूषणमुक्त दिवाळी!

फटाक्यांवरील खर्चाला फाटा; फराळ, नवीन कपडे व जीवनोपयोगी साहित्याचे वाटप – सामाजिक उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष

मोहपा : फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायुप्रदूषण टाळून पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत ‘फटाके व प्रदूषणमुक्त दिवाळी’ हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष असून, मातोश्री वृद्धाश्रम, आदासा आणि स्वामी विवेकानंद वृद्धाश्रम, सावनेर येथील आजी-आजोबांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीचा फराळ, फळे, नवीन कपडे, खेळणी, वाचनासाठी पुस्तके तसेच विविध जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आजी-आजोबांसोबत लक्ष्मीपूजन करून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्यात आला. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत स्नेह, जिव्हाळा आणि आनंदाची देवाणघेवाण करण्यात आली.

या सामाजिक उपक्रमासाठी क्रांतीसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कल, मोहपा, अक्षरक्रांती प्रतिष्ठान, खापरखेडा, मधुगंगा पतसंस्था, मोहपा, गजानन महाराज देवस्थान, मोहपा, विष्णु भगवान नर्सरी, देवबर्डी, लायन्स क्लब, नागपूर, भवानी देवी देवस्थान, मोहपा तसेच लोकमत सखी मंच, मोहपा या संस्थांनी सहकार्य केले.

या उपक्रमात डॉ. प्रशांत महाजन, शंकर घोरसे, नंदू आखरे, विजय मानमोडे, निलेश गुळांदे, सुमित कुंभे, सौ. शुभांगी कुंभे, रत्नाकर चिमोटे, कल्पना चिमोटे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी ग्रामगीताचार्य पंकज कोरडे तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला डॉ. महात्मे, सागर कौटकर, गोहणे, सरिताताई वाघदे, चुकांबे, सपना मानकर, वासुदेव रेवतकर, आशिष रेवतकर (महाजन), माधव चर्जन (नगराध्यक्ष, नगर परिषद मोहपा), सरिताताई अंजनकर (नगरसेवक, नगर परिषद मोहपा), महेश गणोरकर, डॉ. राजेंद्र ढवळे, राजू चर्जन, राहुल गहुकर, मुरलीधर खाटिक, शैलेश बनसोड, श्वेता लोणारे, राहुल श्रीखंडे, अविनाश राऊत, संजय माकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

फटाक्यांवर अनावश्यक खर्च करण्याऐवजी तोच पैसा गरजू, वंचित आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी खर्च करावा, पर्यावरणाचे रक्षण करावे आणि सामाजिक बांधिलकी जपावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

फटाक्यांच्या आतषबाजीपेक्षा माणुसकीच्या प्रेमाचा प्रकाश अधिक मोलाचा असतो, याची प्रचिती या उपक्रमातून आली. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच या प्रदूषणमुक्त दिवाळीची खरी फलश्रुती ठरली.

0
0

Leave a Reply

Realted News