का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर
मोहपा नगरपरिषदेत विकासकामांचा आढावा
आ. आशिष देशमुख व आ. डॉ. राजीव पोतदार यांच्या उपस्थितीत शासकीय आढावा बैठक कर वसुलीचे कौतुक, आधुनिक मटण मार्केट व विस्तारित पशुबाजाराचा प्रस्ताव
मोहपा | प्रतिनिधी : मोहपा नगरपरिषदेत सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष देशमुख आणि नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य डॉ. राजीव पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय आढावा बैठक पार पडली. दुपारी ३ वाजता झालेल्या या बैठकीत नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचा, प्रलंबित योजनांचा आणि प्रशासकीय कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मान्यवरांचा सत्कार, पॉवर पॉइंटद्वारे कामांचा आढावा
बैठकीच्या प्रारंभी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व गटनेते यांच्या हस्ते दोन्ही आमदारांसह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार (ढेरे) यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे नगरपरिषदेच्या विविध विभागांचे कामकाज, विकास योजना आणि सुरू असलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती सादर केली.
कर वसुलीबद्दल प्रशासनाचे अभिनंदन
यावेळी बोलताना डॉ. राजीव पोतदार यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मोहपा नगरपरिषदेने केलेल्या उल्लेखनीय कर वसुलीबद्दल मुख्याधिकारी व प्रशासनाचे अभिनंदन केले. आगामी वर्षात कर वसुलीत आणखी वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करत त्यांनी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास तसेच विकास प्रस्तावांना मंजुरी मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

आधुनिक मटण मार्केट आणि विस्तारित पशुबाजाराचा प्रस्ताव
आमदार आशिष देशमुख यांनी आपल्या मनोगतात मोहपा येथील पारंपरिक बैल बाजाराचा विस्तार करून त्यामध्ये गाई, म्हशी तसेच शेळ्यांचाही समावेश असलेला पशुबाजार सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. मोहपा शहर दर्जेदार मटणासाठी प्रसिद्ध असल्याने येथे आधुनिक, सुसज्ज आणि नियोजनबद्ध मटण मार्केट उभारण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नगराध्यक्षांचा विश्वास
बैठकीच्या शेवटी नगराध्यक्ष माधव चर्जन यांनी दोन्ही आमदारांचे उपस्थितीबद्दल आभार मानले. नगरपरिषदेच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे तसेच विविध विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आमदारांनी दिलेले आश्वासन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोठ्या संख्येने उपस्थिती
या बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष प्रमोद तपासे, गटनेते मनीष देशमुख, राजेंद्र गणोरकर, सर्व नगरसेवक, पदाधिकारी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










