राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी

राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

कार्यक्रमाची जय्यत तयारी

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी छात्रों की गूंज या विशेष कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. पुणे विमानतळावर त्यांचे आगमन झाले असून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी पुण्यात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचे हे छात्रों की गूंज अभियान सुरू झाले आहे.

आज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सीओईपी परिसरातील एआयएसएसएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जवळपास पंचवीस हजार विद्यार्थी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरात राहुल गांधींचे मोठे पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. विमानतळावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधींचा ताफा हॉटेलवर जाऊन त्यानंतर कार्यक्रमस्थळी रवाना होईल. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’पूर्वी पुण्यात विद्यार्थी संघटना भिडल्या

COEP वसतिगृह परिसरात ABVP-NSUI मध्ये घोषणाबाजी आणि धक्काबुक्की; विद्यार्थिनींवर दबाव आणल्याचे दोन्ही बाजूंचे परस्परविरोधी आरोप

                      लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील COEP तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वसतिगृह परिसरात ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. घोषणाबाजी आणि धक्काबुक्कीनंतर पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

काँग्रेस आणि NSUIने आरोप केला की, राहुल गांधींच्या कार्यक्रमाला समर्थन देणाऱ्या काही विद्यार्थिनींवर दबाव आणण्यात आला. त्यांना धमकावून माफीनामा किंवा कार्यक्रमापासून दूर राहण्यास भाग पाडल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

दुसरीकडे, ABVPने हे आरोप फेटाळून लावत NSUI आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींवर राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला. या प्रकरणावरून दोन्ही संघटनांकडून परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत.

दरम्यान, पुणे पोलिसांनी युवक काँग्रेसच्या सुमारे ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवल्याचे वृत्त आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

आज राहुल गांधींचा विद्यार्थ्यांशी संवाद

राहुल गांधी शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. शिक्षण, रोजगार, सुरक्षितता, समानता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातील संधी यांसारख्या विषयांवर संवाद होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

कार्यक्रमाला पोलिसांनी ३० अटींसह परवानगी दिली असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

0
0

Leave a Reply

Realted News