चालकाच निघाला विश्वासघातकी! समृद्धी महामार्गावर पोटदुखीचा बहाणा, व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ४.५ कोटींचे सोने लुटले
मेहकर (प्रतिनिधी) – मुंबईकडे निघालेल्या एका सराफा व्यापाऱ्याच्या गाडीत चालकानेच पोटदुखीचा बहाणा करून गाडी थांबवली आणि काही क्षणांतच पाच दरोडेखोरांनी व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, त्याच्या हातावर चाकूचे वार करत जवळपास पावणेपाच किलो सोने (सुमारे ४ कोटी ५० लाख रुपये) लुटून नेले. ही धक्कादायक घटना २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास समृद्धी महामार्गावर फर्दापूर टोलनाका पार केल्यानंतर घडली.
मुंबईचे सराफा व्यापारी अनिल शेशमलजी जैन चौधरी (रा. मुंबई) हे खामगावहून मुंबईकडे जात असताना आपल्या गाडी (MH 43 BU 9557) मधून समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. फर्दापूर टोलनाका पार केल्यानंतर काही अंतरावर त्यांच्या चालकाने अचानक पोट दुखत असल्याचे सांगून गाडी थांबवायला लावली. गाडी थांबताच एका इनोव्हा कारमधून आलेल्या ४-५ अज्ञात दरोडेखोरांनी व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. याच वेळी त्यांचा चालक व्यापाऱ्याच्या जवळील पावणेपाच किलो सोन्याची बॅग घेऊन थेट दरोडेखोरांच्या गाडीत बसला. दरोडेखोरांनी मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने पलायन केले.
नाकेबंदी असूनही चुकवला सापळा
घटनेनंतर व्यापारी अनिल चौधरी यांनी तत्काळ मेहकर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अकोला, पातूर परिसरात नाकेबंदी केली असतानाही दरोडेखोर पातूरजवळच्या जंगलात आपली इनोव्हा गाडी सोडून फरार झाले.

चालकच मुख्य सूत्रधार?
या प्रकरणात विशेष म्हणजे व्यापाऱ्याचा चालकच कटात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, चालकाच्या भूमिकेवर संशय वाढला आहे. याशिवाय व्यापारी चौधरी हे पोलिसांना अपुरी व संशयास्पद माहिती देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
मेहकर पोलिसांसह अकोला व पातूर पोलिसांची संयुक्त टीम तपास करत असून, दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन यांचा अभ्यास सुरू आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले असून, समृद्धी महामार्गावर सुरक्षेची पुनर्रचना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.














Users Today : 3
Users Yesterday : 11