नोएडामध्ये दररोज 500 डॉग बाईटच्या घटना
सर्वोच्च न्यायालयाने दिले नसबंदीचे आदेश
दिल्ली : नोएडामध्ये भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे दररोज सुमारे 500 लोकांना रुग्णालयात जावे लागते. केवळ जुलै महिन्यात गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात 15,961 डॉग बाईटची प्रकरणे नोंदवली गेली.
या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने 11 ऑगस्ट रोजी दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून श्वान आश्रयस्थानी ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र 22 ऑगस्ट रोजी कोर्टाने आदेशात बदल करत कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी करून त्यांना पुन्हा सोडण्याचे निर्देश दिले.
दरमहा फक्त 500 कुत्र्यांचे नसबंदीकरण होणार्या केंद्रांमध्ये सुविधा अपुर्या आहेत. दिल्लीत एकही सरकारी श्वान निवारागृह नाही, आणि 20 नसबंदी केंद्रांपैकी बहुतेक स्वयंसेवी संस्था चालवतात.

विरोधकांचे म्हणणे आहे की, लसीकरण व नसबंदीवर भर न देता सर्व कुत्र्यांना बंदिस्त करणे अयोग्य आहे. तर काही नागरिक आणि नेत्यांचा आग्रह आहे की मानवी जीवन वाचवण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, रेबीजमुळे होणार्या एकूण मृत्यूंपैकी 36ः मृत्यू भारतात होतात.
या पार्श्वभूमीवर, कुत्र्यांचे प्रभावी व्यवस्थापन, सक्षम नसबंदी केंद्रांची गरज आणि प्रबळ अंमलबजावणी यांची नितांत आवश्यकता आहे.












