December 1, 2025 5:51 am

सरकारचे शिष्टमंडळ बच्चू कडूंच्या भेटीला : कर्जमाफीवर अद्याप तोडगा नाही

उद्या मुख्यमंत्र्यांशी बैठक ठरली

“निर्णय झाला नाही तर रेल्वेवर चढू” असा कडूंचा इशारा

नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांचे आंदोलन आजही सुरू असून नागपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर शेकडो शेतकरी ठिय्या देऊन बसले आहेत. याच आंदोलनस्थळी आज संध्याकाळी सुमारे आठच्या सुमारास मंत्री पंकज भोयर यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे शिष्टमंडळ भेटीस आले.
                         यावेळी बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त करत म्हटले, “तुम्ही चार वाजता येणार म्हणालात, पण कोर्टाच्या आदेशानंतर आलात. इतके दिवस आम्ही इथे आंदोलन करत आहोत आणि आजच तुम्हाला वेळ मिळाला?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
                         शिष्टमंडळाने आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी घोषणाबाजी करत ही विनंती फेटाळली. बच्चू कडूंनी ठामपणे सांगितले की, “सरकारला आमच्या मागण्या माहीत आहेत — मुख्य मागणी म्हणजे कर्जमाफीची. त्यावर निर्णय घ्यायचा असेल तरच या चर्चेला अर्थ आहे.”
 
                         यावर मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. मात्र, कडूंनी तात्काळ प्रतिसाद देत म्हटले, “मुख्यमंत्र्यांना आत्ता फोन लावा आणि विचारा — कर्जमाफी देणार का? फक्त फोन लावण्यात अर्थ नाही.” अखेरीस ठोस निर्णय न झाल्याने शिष्टमंडळ निघून गेले आणि आंदोलन सुरूच राहिले.

मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा

                        नंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पंकज भोयर पुन्हा आंदोलनस्थळी येऊन म्हणाले, “उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल. त्या बैठकीत कर्जमाफीसह सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. सर्व संबंधित अधिकारी तिथे उपस्थित असतील,” अशी ग्वाही त्यांनी दिली. या दरम्यान बच्चू कडूंनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही फोनवर संवाद साधला.

“निर्णय न झाल्यास रेल्वेवर चढू” – बच्चू कडू

                         बच्चू कडूंनी स्पष्ट केले की, “आपले आंदोलन थांबवणार नाही. सरकार म्हणते कर्जमुक्ती देऊ, पण तारीख सांगत नाही. आमची मागणी तारीख ठरवण्याची आहे. जर सरकारने तारीख दिली नाही, तर रेल्वे बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.”
                          त्यांनी आंदोलकांना आवाहन केले की, “कोणाच्याही गाड्या अडवू नका, पोलिसांनी काही कारवाई केली तर आपण मंत्र्यांच्या घरात जाऊन बसू.” तसेच उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News