“शेतकऱ्यांच्या हाकेला धावले जरांगे!” नागपूरकडे तातडीने रवाना
नागपूर प्रतिनिधी : अतिवृष्टीने हतबल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा रणांगणात उतरले आहेत. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ते तातडीने नागपूरकडे रवाना झाले.
जरांगे पाटील म्हणाले “शेतकरी नागपूरमध्ये सर्व काही सोडून बसला आहे. ही अतिटतीची वेळ आहे. आपण सर्वांनी आपल्या मायबाप शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे.”
दरम्यान, बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला वेग येत आहे. सरकारच्या दोन मंत्र्यांनी चर्चा केली असली तरी कर्जमाफीची तारीख अजूनही ठरलेली नाही. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निर्णायक बैठक होणार आहे.

कडू म्हणाले “कर्जमुक्तीची तारीख न दिल्यास रेल्वे बंद केल्याशिवाय पर्याय नाही! आमचं आंदोलन मागे हटणार नाही.” तसंच त्यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन करत सांगितलं, “कोणाच्याही गाड्या अडवू नका. अन्याय झाला तर आम्ही मंत्र्यांच्या घरात जाऊन बसू.”
एका बाजूला पावसाने उद्ध्वस्त शेती, दुसऱ्या बाजूला आश्वासनांवर चाललेली राजकारणाची खेळी — या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या नागपूर धावणीने आंदोलनाला नवं बळ आणि देशभराचे लक्ष मिळवून दिलं आहे.
नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर आंदोलकांकडून महामार्ग मोकळा
आंदोलनामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेत नागपूर खंडपीठाने बुधवारी सायंकाळपर्यंत महामार्ग आणि इतर रस्ते मोकळे करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आंदोलकांनी महामार्ग मोकळा करून दिला. मुंबईहून शिष्टमंडळ चर्चा करून परत येईपर्यंत आंदोलक काॅटन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लागून असलेल्या आंदोलनस्थळी थांबणार आहेत. प्रशासन तिथे पाणी, वीज आदी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तत्पूर्वी कडू स्वतःहून अटकेसाठी पोलिस ठाण्याकडे पायी निघाले होते.









