सावनेरमध्ये ४,९११ नागरिकांची महाआरती
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर
सावनेर : रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त सावनेर येथे आयोजित भव्य महाआरती सोहळ्याने जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवले आहे. नगर परिषद मैदानावर आयोजित या कार्यक्रमात एकाच वेळी ४,९११ नागरिकांनी महाआरती करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या उपक्रमाची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis प्रमुख उपस्थित होते. रात्री ८ वाजता हजारो दिव्यांच्या प्रकाशात झालेल्या या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

कार्यक्रमाचे आयोजन आमदार Ashish Deshmukh यांनी केले होते. विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाने केवळ विक्रम प्रस्थापित केला नाही, तर सामाजिक एकात्मता आणि आध्यात्मिकतेचे प्रभावी दर्शन घडवले.
या वेळी महसूल व पालकमंत्री Chandrashekhar Bawankule, वित्त व नियोजन राज्यमंत्री Ashish Jaiswal, माजी मंत्री Ranjit Deshmukh यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भाजप नेते डॉ. राजीव पोद्दार, डॉ. मनोहर कुंभारे, नगराध्यक्षा संजना मंगळे आणि खापा नगराध्यक्ष पीयूष बुरडे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकरी कर्जमाफीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, जगभर अस्थिरतेच्या वातावरणात सावनेरमध्ये हजारो नागरिकांनी एकत्र येऊन शांततेसाठी प्रार्थना करणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने जगात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याआधी अयोध्येत मुख्यमंत्री Yogi Adityanath यांच्या उपस्थितीत झालेला विक्रम सावनेरने मोडीत काढला असून, या कामगिरीमुळे सावनेर-कळमेश्वर परिसरासह महाराष्ट्र आणि देशाची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर उंचावल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
आमदार आशिष देशमुख यांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ विक्रमासाठी नसून अंधारातून प्रकाशाकडे आणि संघर्षातून शांततेकडे वाटचाल करण्याचा सामूहिक संकल्प आहे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे यांनी केले.











Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0