सावनेर–कळमेश्वर तालुक्यात पाणीटंचाई होऊ देणार नाही – आमदार डॉ. आशिष देशमुख
सावनेर | प्रतिनिधी
सावनेर–कळमेश्वर तालुक्यातील कोणत्याही गावाला येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीच्या व प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिले.
दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर तालुक्याची आढावा बैठक सावनेर पंचायत समिती येथे, तर कळमेश्वर तालुक्याची आढावा बैठक कळमेश्वर पंचायत समिती येथे पार पडली.
या बैठकीत सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील सर्व गावांमधील पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे स्रोत अपुरे आहेत किंवा नव्याने सुविधा आवश्यक आहेत, त्या गावांकडून माहिती घेण्यात आली. हंडपंप, विहिरी, नळयोजना तसेच इतर पाणीपुरवठा योजनांच्या मागण्यांची सविस्तर नोंद करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार डॉ. आशिष देशमुख म्हणाले की, सर्व नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. यासाठी सरपंच, संबंधित अधिकारी व यंत्रणांनी समन्वयाने काम करून तातडीने उपाययोजना कराव्यात. पाणीपुरवठ्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
![]()
तसेच, इच्छुक सरपंचांना महाराष्ट्रातील आदर्श गावांचा अभ्यास दौरा आयोजित करून देण्यात येईल. भास्करराव पेरे आणि पोपटराव पवार यांच्या गावांप्रमाणे सावनेर–कळमेश्वर तालुक्यातही आदर्श गावे निर्माण करून सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक धोटे, अशोक तांदुळकर, तहसीलदार अक्षय पोयाम, गट विकास अधिकारी हिरुडकर, तहसीलदार विकास बिक्कड, चंद्रशेखर लांडे, बाबा बुर्हान, प्रमोद पिंपळे, प्रिया मानकर, मीना तायवाडे, स्वप्नील चौधरी, शैलेंद्र अस्वले, संदीप उपाध्ये, दिलीप धोटे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
![]()