मनसेला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका
बिनविरोध निवडीविरोधातील याचिका फेटाळली; न्यायालयाकडून खडेबोल
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या बिनविरोध निवडीला आव्हान देणारी मनसे नेते अविनाश जाधव यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकेतील चुकीच्या माहितीबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावले.
या याचिकेचा उल्लेख सकाळी होताना ती इतर प्रलंबित याचिकांसारखीच असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले होते. मात्र, सुनावणीदरम्यान ऑनलाईन उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी ही याचिका थेट निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले. यामुळे याचिकाकर्त्यांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे मुख्य न्यायाधीश एस. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना जाब विचारताना, “सकाळी याचिका इतर प्रकरणांसारखी असल्याचे चुकीचे विधान करण्यात आले. प्रत्यक्षात या याचिकेचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. अशी चुकीची माहिती देण्यामागे नेमका उद्देश काय?” असा सवाल केला. न्यायालयाने सुरुवातीला चुकीची माहिती दिल्याबद्दल दंड ठोठावण्याचे संकेत दिले होते.
दीर्घ युक्तिवादानंतर न्यायालयाने दंडात्मक कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत अविनाश जाधव यांची याचिका फेटाळून लावण्यात आली.
दरम्यान, राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान होण्यापूर्वीच ६६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे सर्वाधिक ४४, तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे १९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या प्रक्रियेवर मनसेने कायदेशीर आक्षेप घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे या बिनविरोध निवडींचा मार्ग मोकळा झाला असून, मनसेसाठी हा मोठा कायदेशीर पराभव मानला जात आहे.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0