सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत नागपूर ग्रामीण पोलिसांचा संवाद

सकारात्मक जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन

नागपूर : सोशल मीडिया हे केवळ माहिती प्रसारित करण्याचे माध्यम नसून नागरिकांचा विश्वास संपादन करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी अधिकृत व विश्वासार्ह माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून समाजहितासाठी जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा, असे आवाहन नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले.

नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत २७ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस भवन, नागपूर येथे संवाद व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलिसांच्या कामगिरीचे सादरीकरण

संवाद सत्रात नागपूर ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आलेल्या उल्लेखनीय कामगिरीसह विविध जनहितकारी उपक्रमांची माहिती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना देण्यात आली. पोलिस विभागाच्या विविध कार्यवाही आणि उपक्रमांची माहिती समाजाच्या विविध घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के
नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के

सोशल मीडियाच्या जबाबदार वापरावर भर

सोशल मीडिया माध्यमांचा जबाबदारीने आणि समाजहितासाठी वापर, पोलीस–जनता समन्वय वाढविणे आणि नागरिकांमध्ये विविध विषयांबाबत जनजागृती निर्माण करणे, या मुद्द्यांवर विशेष चर्चा झाली.

यावेळी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी विविध विषयांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्न व शंकांना वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी उत्तरे देत त्यांचे निराकरण केले.

अफवांऐवजी अधिकृत माहिती पोहोचविण्याचे आवाहन

हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून त्याचा योग्य आणि सकारात्मक वापर केल्यास नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मोठी मदत होऊ शकते. नागरिकांपर्यंत अधिकृत, अचूक आणि विश्वासार्ह माहिती पोहोचविण्यासोबतच समाजात सकारात्मक जनजागृती निर्माण करण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सनी सोशल मीडिया जबाबदारीने हाताळावा, असे त्यांनी आवाहन केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती पूजा गायकवाड, सहायक पोलीस अधीक्षक सावनेर विभाग सागर खर्डे, सहायक पोलीस अधीक्षक उमरेड विभाग मयंक माधव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक रमेश बरकते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग पराग पोटे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

पोलीस–जनता समन्वयाला मिळणार बळ

पोलीस विभाग आणि सोशल मीडिया क्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये झालेल्या या संवादामुळे पोलीस–जनता समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. तसेच पोलिसांच्या समाजहिताच्या उपक्रमांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक स्वरूप देऊन नागरिकांमध्ये सकारात्मक जनजागृती निर्माण करण्यासाठी हे संवाद सत्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईलवर, थेट आपल्या गावातून

संजय श्रीखंडे : 📲 9579867431

 

0
0

Leave a Reply

Realted News