१२ हजार रुपये प्रतिलिटर गधीचे दूध!
बेरोजगारीतून उभा राहिलेला आगळा व्यवसाय; गडचांदूरच्या संतोष गोरे कुटुंबाची आश्चर्यकारक कहाणी
काटा वृत्तसेवा I
कळमेश्वर/सावनेर : गायी-म्हशीच्या दुधाच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांना चटके देत असतानाच, गधीचे दूध थेट १२ हजार रुपये प्रतिलिटर! — ही बातमी ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. मात्र ही केवळ अफवा नसून, चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील युवक संतोष गोरे आणि त्याचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्यक्षात हा व्यवसाय करत आहे.
दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला संतोष गोरे बेरोजगारीने त्रस्त झाला. हाताला काम नाही, उत्पन्नाचा स्थिर स्रोत नाही—या परिस्थितीत न डगमगता त्याने पारंपरिक पण दुर्मिळ व्यवसायाची वाट निवडली. आज संतोष, त्याची पत्नी, आजी-आजोबा, आई-वडील आणि दोन मामा असे एकूण सात जण, प्रत्येकी एक गाढवीण सांभाळत सात गाढविणांसह गावोगावी फिरून गधीचे दूध विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
![]()
पंधरा-वीस दिवस एका गावात मुक्काम
हे कुटुंब एका गावात पंधरा ते वीस दिवस मुक्काम करते. सकाळ-संध्याकाळ गावात फिरून ग्राहकांना समोरच्या समोर लगेच दूध काढून दिले जाते. गधीचे दूध १० ते १५ मिली क्षमतेच्या पितळी मापाने, प्रति माप १०० रुपये दराने विकले जाते. या दराने पाहता गधीच्या दुधाची किंमत तब्बल १२ हजार रुपये प्रतिलिटर इतकी होते.
‘औषधी’ गुणधर्मांची चर्चा
संतोष गोरे यांचा दावा आहे की गधीचे दूध निमोनिया, ऍसिडिटी, त्वचारोग, पोटाचे विकार यांसारख्या आजारांवर उपयुक्त ठरते. अनेक ग्राहकांना याचा लाभ झाल्याचे अनुभव ऐकायला मिळतात. याच विश्वासावर गावोगावी ग्राहक स्वतःहून या कुटुंबाकडे येतात.
एका गाढवीणीतून रोज हजारो रुपयांची कमाई
एका गाढवीणीतून दररोज एक हजार ते पंधराशे रुपये उत्पन्न मिळत असल्याची माहिती संतोष गोरे यांनी दिली. सात गाढविणांमुळे कुटुंबाचा संपूर्ण प्रपंच या व्यवसायावर अवलंबून आहे.
सात महिने भ्रमंती, पाच महिने शेती
हे कुटुंब वर्षातील सात महिने गावोगावी भ्रमंती करत दूध विक्री करते. मार्च महिन्यात होळीपूर्वी ते आपल्या मूळ गावी गडचांदूर (जि. चंद्रपूर) येथे परततात. पुढील पाच महिने शेतीची पेरणी व अन्य कामे पूर्ण करून पुन्हा गाढवांसह दूध विक्रीसाठी बाहेर पडतात.
कळमेश्वरनंतर सावनेर येथे मुक्काम
कालपर्यंत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील ब्राम्हणी फाट्यावर सुमारे वीस दिवस मुक्काम केल्यानंतर, सध्या हे कुटुंब सावनेर नगरपरिषद ग्राउंडवर वास्तव्यास आहे.
नाइलाजातून नवोपक्रमाकडे
ही कहाणी केवळ गधीच्या दुधाच्या किमतीची नाही, तर बेरोजगारीच्या संकटातून मार्ग काढणाऱ्या कष्टकरी कुटुंबाच्या जिद्दीची आहे. शिक्षण कमी असले तरी अनुभव, परिश्रम आणि परंपरागत ज्ञानाच्या जोरावर संतोष गोरे कुटुंबाने स्वतःचा उदरनिर्वाह उभा केला आहे. आज गडचांदूरच्या या कुटुंबाची ही आगळी-वेगळी वाटचाल केवळ आश्चर्यकारक नाही, तर स्वावलंबन, कष्ट आणि जगण्याची नवी दिशा दाखवणारी ठरते. संतोष गोरे याचे मते ”मोदींच्या ताली बजाव… थाली बजाव..’’ ने कोरोनाचं काय झालं ? हे माहित नाही, पण ”गधीच्या दुधानं” हजारोंना जीवदान दिल्याचं पुण्य लाभल्याचं संतोष अभिमानांन सांगतो.
![]()
गधीचे दूध मानवी आरोग्यासाठी लाभदायक; पोषणतज्ज्ञांचा सकारात्मक सूर
गायी-म्हशीच्या दुधाव्यतिरिक्त आता गधीचे दूध (Donkey’s Milk) मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे विविध अभ्यासांतून समोर येत आहे. प्राचीन काळापासून औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे गधीचे दूध आज आधुनिक वैद्यकीय संशोधनामुळे पुन्हा चर्चेत आले असून, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि अॅलर्जीग्रस्त व्यक्तींकरिता ते फायदेशीर ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पोषणतज्ज्ञांच्या मते गधीच्या दुधाची रचना मानवी आईच्या दुधाशी बऱ्याच अंशी साधर्म्य राखणारी आहे. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण संतुलित असून फॅट कमी असल्याने हे दूध पचनास हलके ठरते. गायीच्या दुधामुळे अॅलर्जी किंवा पचनाचे विकार होणाऱ्या व्यक्तींना गधीचे दूध पर्यायी आणि सुरक्षित ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
गधीच्या दुधात लायसोझाइम व लॅक्टोफेरिन हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हे घटक जंतुसंसर्गाविरुद्ध लढण्यास मदत करतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे वारंवार सर्दी-खोकला, संसर्गजन्य आजार होणाऱ्या व्यक्तींकरिता हे दूध उपयुक्त मानले जात आहे.
![]()
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते गधीचे दूध त्वचेसाठीही लाभदायक आहे. कोरडी त्वचा, एक्झिमा, सोरायसिस यांसारख्या समस्यांमध्ये गधीच्या दुधाचा उपयोग फायदेशीर ठरतो. याच कारणामुळे सौंदर्यप्रसाधने आणि औषधी साबणांमध्ये गधीच्या दुधाचा वापर वाढत आहे.
हृदयविकाराच्या दृष्टीनेही गधीचे दूध सुरक्षित मानले जाते. कमी फॅट व कमी कोलेस्टेरॉलमुळे हृदयावर ताण कमी पडतो. तसेच ओमेगा-३ फॅटी अॅसिड्समुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात.
![]()
दरम्यान, आरोग्यतज्ज्ञांनी गधीचे दूध सेवन करताना काही खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दूध नेहमी उकळून किंवा पाश्चराइज करूनच सेवन करावे. लहान बाळे, गरोदर महिला किंवा आजारी व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे दूध घ्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एकंदर पाहता, दुर्मिळ असले तरी गधीचे दूध हे पोषणमूल्यांनी समृद्ध आणि मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरत आहे. योग्य मार्गदर्शन आणि सुरक्षित वापर केल्यास गधीचे दूध आरोग्यसंवर्धनासाठी एक प्रभावी पर्याय ठरू शकतो, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.