KALMESHWAR : आकाशनगरातील लॉजवर पोलिसांची धाड

आकाशनगरातील लॉजवर पोलिसांची धाड

कथित देहव्यापार प्रकरणी मालकासह दोघांना अटक

का टा वृत्तसेवा : भूषण सवाईकर/ संजय श्रीखंडे

कळमेश्वर : शहरातील आकाशनगर परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या अड्ड्यावर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत लॉजचा मालक जितेंद्र गोविंद कोल्हे व व्यवस्थापक अजय नंदकिशोर डेहरिया यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ५ जूनच्या रात्री सापळा रचण्यात आला. बोगस ग्राहकाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पडताळणीत लॉजमध्ये कथितरित्या देहव्यापार सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान एका महिलेची सुटका करण्यात आली. तसेच मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गेस्ट रजिस्टरसह एकूण १४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक तपासात महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुख्य आरोपी जितेंद्र कोल्हे याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे.

विशेष म्हणजे, संबंधित लॉजबाबत स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले जाते. परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी संशयास्पद हालचाली दीर्घकाळापासून सुरू होत्या. यापूर्वीही याच ठिकाणी कारवाई झाल्याची चर्चा असून, त्यामुळे पोलिसांच्या देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, या दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

स्थानिक नागरिकांनी शहरातील अवैध धंद्यांविरोधात अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईची मागणी केली आहे. परिसरात अवैध मद्यविक्री, बेकायदा प्रवासी वाहतूक तसेच अमली पदार्थांच्या विक्रीसंदर्भातही तक्रारी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या बाबींची पोलिसांकडून चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कळमेश्वर पोलिसांच्या सहकार्याने केली.

1
0

Leave a Reply

Realted News