मान्सूनचा वेगवान प्रवास; ५ दिवसांत १३ राज्यांत प्रवेश
केरळ-कर्नाटकात अतिवृष्टीचा रेड अलर्ट, राजस्थानात उष्णतेच्या लाटेचा इशारा
भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा, दि. ९ जून : देशभरात नैऋत्य मान्सूनने वेगाने आगेकूच सुरू ठेवली असून अवघ्या पाच दिवसांत १३ राज्यांपर्यंत त्याची मजल पोहोचली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी मान्सूनने तेलंगणामध्ये प्रवेश केला असून पश्चिम किनारपट्टीवर तो मुंबईपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर पोहोचला आहे. पुढील ४८ तासांत मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांना दिलासा मिळाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये सोमवारी जोरदार पाऊस झाला, तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर व जालौन येथेही पावसाने हजेरी लावली. राजस्थानातील काही भागांमध्ये ६० ते १२० किमी प्रतितास वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली.
दुसरीकडे, राजस्थानच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असून श्रीगंगानगर येथे सोमवारी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. फलोदी येथे ४४.८ अंश, तर जैसलमेर आणि बिकानेर येथे ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
हवामान विभागाने केरळमधील सर्व जिल्ह्यांसह कर्नाटकातील दोन जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. मंगळवारी देशातील किमान १५ राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.

३ दिवस उशिराने आलेला मान्सून आता वेगाने सरकतोय
यंदा मान्सूनने केरळ किनारपट्टीवर ४ जून रोजी, म्हणजेच नेहमीपेक्षा तीन दिवस उशिराने हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर त्याने वेग घेत अवघ्या पाच दिवसांत १३ राज्यांमध्ये प्रवेश केला. रविवारी मान्सून त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडपर्यंत पोहोचला होता, तर सोमवारी त्याने तेलंगणातही प्रवेश केला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच ईशान्य भारतातील उर्वरित भागांमध्ये आणखी पुढे सरकू शकतो. ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
मुंबईत मान्सून पोहोचण्याची सामान्य तारीख १० जून मानली जाते. यंदाही पुढील ४८ तासांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज
१० जून :
- बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांत पाऊस व वादळी वाऱ्यांचा अंदाज.
- आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
- केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात व्यापक पावसाचा अंदाज.
- मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ४० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
११ जून :
- दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज.
- या भागांत ५० ते ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
- हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस व गारपीट होण्याची शक्यता.
- बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा.
- केरळ, कर्नाटक आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता कायम.

- साभार ‘दिव्य मराठी’








