करवाढीविरोधात मोहपा पेटले!
मालमत्ता कर, पाणीकरासह स्थानिक करांतील वाढीव दर रद्द करण्यासाठी नागरिकांचा नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा
का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर
मोहपा | प्रतिनिधी : मोहपा शहरातील मालमत्ता कर, पाणीकर तसेच इतर स्थानिक करांमध्ये करण्यात आलेल्या वाढीच्या निषेधार्थ आज नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले. गांधी चौकातून निघालेल्या मोर्चाने नगरपरिषद कार्यालयावर धडक देत वाढीव कर तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. या आंदोलनात महिला, युवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध भागांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महागाईमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असताना मालमत्ता कर, पाणीकर आणि इतर स्थानिक करांमध्ये करण्यात आलेली वाढ ही जनतेवर अन्याय करणारी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. घरखर्च, शिक्षण, आरोग्य आणि इतर अत्यावश्यक गरजांच्या वाढत्या खर्चामुळे नागरिक अडचणीत असताना करांचा अतिरिक्त बोजा लादणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोर्चादरम्यान “करवाढ रद्द करा, सामान्य नागरिकांना दिलासा द्या”, “अन्यायकारक कर आकारणी बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधत करवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी केली.
आंदोलनानंतर शिष्टमंडळाने नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक जितेंद्र नरळे यांना निवेदन सादर केले. निवेदनात मालमत्ता कर, पाणीकर व इतर स्थानिक करांमध्ये करण्यात आलेली वाढ तात्काळ कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात अधिक व्यापक व तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.









