🚨 ब्रेकिंग न्यूज | कामगार टाइम्स
🔥 नागपूर परिक्षेत्रात महसूल विभाग सर्वाधिक भ्रष्ट?
एसीबीचे १९ सापळे; पोलीस दुसऱ्या, आरटीओ तिसऱ्या क्रमांकावर
नागपूर : नागपूर परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांनी जानेवारी २०२५ ते जून २०२६ या कालावधीत केलेल्या कारवायांमध्ये महसूल विभाग सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या रडारवर आला आहे. या कालावधीत महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर १९ यशस्वी लाचलुचपत सापळे रचण्यात आले असून, पोलीस विभाग १२ कारवायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
एसीबीने या कालावधीत केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच नव्हे, तर मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्धही धडक कारवाया केल्या आहेत.
आरटीओ विभागात ८ सापळे; १७ जणांवर गुन्हे
भ्रष्टाचाराच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आरटीओ विभागात ८ यशस्वी सापळे रचण्यात आले. या प्रकरणांमध्ये ३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO), ४ मोटार वाहन निरीक्षक (MVI), १ लिपिक आणि ८ खाजगी एजंट अशा एकूण १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
एसीबीच्या माहितीनुसार, काही आरटीओ तपासणी नाक्यांवर अधिकारी स्वतः लाच स्वीकारण्याऐवजी खाजगी एजंटांमार्फत बेकायदेशीर वसुली करत असल्याचे उघड झाले. अशा प्रकरणांमध्ये संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम १२ (अपप्रेरणा) अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
इतर विभागांची स्थिती
महसूल आणि पोलीस विभागांनंतर विविध विभागांतील कारवायांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:
- महसूल विभाग – १९ सापळे
- पोलीस विभाग – १२ सापळे
- आरटीओ विभाग – ८ सापळे
- आरोग्य विभाग – ६ सापळे
- वन विभाग – ५ सापळे
- ग्रामविकास विभाग – ५ सापळे
- वीज मंडळ – ५ सापळे
- शिक्षण विभाग – ४ सापळे
- कृषी विभाग – ४ सापळे
- जिल्हा परिषद – ३ सापळे
- पंचायत समिती, महानगरपालिका, भूमी अभिलेख, मुद्रांक व नोंदणी आणि जलसंपदा विभाग – प्रत्येकी २ सापळे
लाच मागितल्यास त्वरित तक्रार करा
एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी झाल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी.
पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी सांगितले की, सापळा कारवाईसाठी वापरलेली तक्रारदाराची रक्कम एका महिन्याच्या आत परत केली जाईल. तसेच संबंधित विभागात अडकलेले वैध काम पूर्ण करून देण्यासाठीही मदत केली जाईल.
तक्रारीसाठी संपर्क
☎️ टोल फ्री : १०६४
📱 व्हॉट्सॲप : ९०६७६७१०६४










