का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल
कारंजा घाडगे येथे ज्येष्ठ नागरिक संवाद उपक्रम उत्साहात संपन्न
वर्धा पोलिसांच्या पुढाकारातून ज्येष्ठांशी थेट संवाद
समस्या मांडण्याचे व समाजप्रबोधनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
कारंजा घाडगे : वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने कारंजा घाडगे पोलिस स्टेशन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘ज्येष्ठ नागरिक संवाद उपक्रम’ उत्साहात पार पडला. पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर
बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी कारंजा घाडगे पोलिस स्टेशनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघ, कारंजा घाडगे यांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारंजा घाडगे पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी केले.

समस्या असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधा
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक तथा आर्वी विभागाच्या पोलिस उपअधीक्षक सरिता चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, सुरक्षितता आणि पोलिस प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण किंवा समस्या निर्माण झाल्यास विलंब न करता थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
तरुण पिढीच्या प्रबोधनासाठी ज्येष्ठांनी पुढाकार घ्यावा
सरिता चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनात समाजातील पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्ये वाढत असलेल्या असामाजिक प्रवृत्तींबाबत चिंता व्यक्त केली. या परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून तरुण पिढीचे प्रबोधन करावे आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थित ज्येष्ठांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
ज्येष्ठांनी मांडल्या विविध समस्या
यावेळी ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष प्रा. सुभाष अंधारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच अशोक पालीवाल, विनोद दंढारे, अरविंद चरडे, चंदू भुयार, प्रकाश चौधरी, प्रा. अनिस मुल्ला, दिलीप राठी, प्रदीप शेटे, मधुसूदन डोबले आणि भिकमचंद राठी यांनी ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडून संवाद उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
मोठ्या संख्येने उपस्थिती
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदीप शेटे यांनी केले. या संवाद उपक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमातून पोलिस प्रशासन आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यास मदत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.









