कळमेश्वरात २२ जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’
एकाच ठिकाणी मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ
महसूल, कृषी, बँकिंग, घरकुल, महिला सक्षमीकरण, कर्जमुक्ती, सातबारा, गावठाण सनद आदी सेवांसाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
कळमेश्वर | मयंक वरघट
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – २०२६’ अंतर्गत कळमेश्वर येथे विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिरभाते सभागृह, तळ्याची पाळ, कळमेश्वर येथे हे शिबिर पार पडणार असून, नागरिकांना विविध शासकीय योजना व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ, प्रमाणपत्रांचे वितरण, अर्ज स्वीकारणे, मार्गदर्शन तसेच महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियमांतर्गत विविध शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या सेवांना राहणार प्राधान्य
- महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्रांचे वितरण.
- गावठाण स्वामित्व सनदांचे वितरण.
- मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेबाबत कार्यवाही.
- शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत मार्गदर्शन.
- तुकडेबंदी कायद्याअंतर्गत स्थानिक क्षेत्र घोषणेसंदर्भातील कार्यवाही.
- “जिवंत सातबारा” मोहिमेअंतर्गत विविध सेवा.
- सिंधी विस्थापितांसाठी विशेष अभय योजना-२०२५चा लाभ.
- राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेची माहिती व लाभ.
- घरकुल योजनांशी संबंधित प्रकरणांचा निपटारा.
- कुंभार समाजासाठी पारंपरिक व्यवसायासंदर्भातील सवलती.
- शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफी.
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ बाबत मार्गदर्शन.
- महसूल, कृषी, सहकार, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आरोग्य, बँकिंग तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
तालुक्यातील शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, अनाथ घटक तसेच सर्व पात्र लाभार्थींनी आवश्यक कागदपत्रांसह २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिरभाते सभागृह, तळ्याची पाळ, कळमेश्वर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, कळमेश्वर आणि उपविभागीय अधिकारी, सावनेर उपविभाग यांनी केले आहे.
नागरिकांनी आपल्या प्रलंबित महसुली व इतर शासकीय कामांचा तत्काळ निपटारा करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कळमेश्वर तहसिल कार्यालयाचे वतीने आयोजीत पत्रपरिषदेत नायब तहसीलदार संदिप खडसे व बिलाल खान यांनी केले आहे.











