🚨 सोनम वांगचुक प्रकरण तापले! पत्नीची दिल्ली HC मध्ये धाव; 20 जुलैला ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’ची घोषणा
सफदरजंग रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्याची मागणी
उपोषणाचा २२ वा दिवस, सलाईन-औषधांनाही नकार
सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून हलवण्याची मागणी
नवी दिल्ली | प्रतिनिधी : दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना खाजगी रुग्णालयात हलवण्याची मागणी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी केली आहे. यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, सफदरजंग रुग्णालयावर विश्वास नसल्याचे सांगत सध्याची परिस्थिती “बेकायदेशीर स्थानबद्धता” असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, वांगचुक यांचे उपोषण रविवारी २२ व्या दिवशीही सुरूच असून त्यांनी आयव्ही ड्रिप (सलाईन), ओआरएस आणि औषधे घेण्यास नकार दिला आहे.
20 जुलैला ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’ची घोषणा
रुग्णालयातूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या संदेशात सोनम वांगचुक यांनी 20 जुलैला “दुसरा स्वातंत्र्यलढा” सुरू करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी हा लढा पेपरफुटीसारख्या अन्यायाविरोधात तसेच स्वतःच्या कथित बेकायदेशीर स्थानबद्धतेविरोधात असल्याचे म्हटले आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलन कायम
सोनम वांगचुक आणि CJP (कॉकरोच जनता पार्टी) यांनी 28 जूनपासून NEET पेपरफुटी प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
जंतरमंतरवरील आंदोलन अद्याप सुरू असून CJP चे संस्थापक अभिजित दीपके हे देखील उपोषणात सहभागी आहेत. आंदोलकांनी 20 जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
पोलिस कारवाईपूर्वी रणनीती; व्हिडिओ रोखण्यासाठी ‘जॅमर्स’ची चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 24 तासांत वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून रुग्णालयात हलविण्याची कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 1.30 वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात कारवाईची रणनीती ठरवण्यात आली. कोणताही संघर्ष न होता वांगचुक यांना एका मिनिटाच्या आत रुग्णवाहिकेत हलविण्याचा सराव करण्यात आला.
कारवाईदरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग होऊ नये यासाठी ‘जॅमर्स’ वापरण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे 5 वाजता अधिकारी जंतरमंतरवर पोहोचले आणि साध्या वेशातील पोलिसांनी पांढऱ्या चादरींचा वापर करून कारवाई पूर्ण केली.

पत्नीचा आरोप : “ही वैद्यकीय उपचारांपेक्षा अटकेसारखी परिस्थिती”
गीतांजली अंगमो यांनी द इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित लेखात म्हटले आहे की, “सोनम वांगचुक हे केवळ आंदोलक नाहीत, तर देशभरातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणारे शिक्षक आहेत.”
त्यांनी पुढे आरोप केला की, वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीने सफदरजंग रुग्णालयात नेले असून, तेथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्या हालचालींवर निर्बंध असल्याने ही परिस्थिती वैद्यकीय उपचारांपेक्षा अटकेसारखीच वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.





