सावनेरमध्ये भीषण रेल्वे अपघात; धावत्या ट्रेनच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
सावनेर, प्रतिनिधी : नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे गुरुवारी सकाळी धावत्या रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सकाळी सुमारे १०.१५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेमुळे फिरके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सावनेर परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांची नावे निरंजन लक्ष्मण फिरके (वय ४०) आणि योगेश लक्ष्मण फिरके (वय ३७, दोघे रा. सावनेर) अशी आहेत.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हीतेश बनसोड यांना अंकित हांडे यांनी संपर्क साधला. त्यानंतर बनसोड यांनी सावनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी **’हितज्योती आधार फाउंडेशन’**च्या स्वयंसेवकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह रेल्वे रुळावरून बाहेर काढून सावनेर येथील शासकीय रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नाही
दोघे भाऊ रेल्वे रुळावर कशा परिस्थितीत आले आणि अपघात नेमका कसा घडला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सावनेर पोलीस प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत असून शवविच्छेदन अहवाल, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे घटनेचा सखोल तपास सुरू आहे.





