कळमेश्वर तालुक्यातील 812 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

कळमेश्वर तालुक्यातील 812 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

काटा वृत्तसेवा I मयंक वरघट

कळमेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, कळमेश्वर तालुक्यातील एकूण 812 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने कळवेश्वर तहसीलदार विकास बिक्कड यांनी केले आहे. ते कळमेश्वर तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शासनाच्या निर्णयानुसार या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मूलधन व व्याजासह प्रति शेतकरी कमाल दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली पात्र कर्जे या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात आली आहेत.

तहसीलदार विकास बिक्कड आणि सहाय्यक निबंधक मिलिंद भालेराव
तहसीलदार विकास बिक्कड आणि सहाय्यक निबंधक मिलिंद भालेराव

योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक व यादीतील विशिष्ट क्रमांक सोबत घेऊन संबंधित बँक शाखेत किंवा नियुक्त केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संबंधित यादी गाव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा संस्था तसेच संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विकास बिक्कड आणि सहाय्यक निबंधक मिलिंद भालेराव यांनी केले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News