शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागपुरात ‘निर्भय प्रभात फेरी’

अंधश्रद्धेविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर

दाभोळकरांच्या विचारांची चळवळ पुढे नेण्याचा निर्धार

नागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागपुरात ‘निर्भय प्रभात फेरी’ काढून त्यांना अभिवादन करण्यात आले. दरवर्षी २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रभात फेरीत यंदा नागपूर जिल्ह्यातील समितीच्या विविध शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

संविधान चौक येथून सुरू झालेली प्रभात फेरी जुने मॉरिस कॉलेजमार्गे पुन्हा संविधान चौक येथे परतली. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, शिवांगीनगर, टेकऑफ सिटी, प्रेरणानगर, फुलमतीनगर यासह विविध शाखांतील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रभात फेरीत मुख्य अतिथी म्हणून अशोक जांभुळकर व ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते. समारोपानंतर झालेल्या कार्यक्रमात ज्ञानेश्वर रक्षक, राम काळे, चित्तरंजन चौरे, प्रा. पुष्पा घोडके, रामभाऊ डोंगरे, संध्या राजूरकर यांच्यासह मान्यवरांनी डॉ. दाभोळकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर केला.

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. देवानंद बडगे, देवयानी भगत, शोभा पाटील, सुषमा शेवडे, मंगला गाणार, कांबळे, प्रीती तिरपुडे, शिल्पा मकेश्वर आदींनी डॉ. दाभोळकर यांच्या कार्याला अभिवादन करणारी गीते सादर केली.

डॉ. सुनील भगत यांनी प्रभात फेरी व कार्यक्रमाचे संचालन केले. उमेश चिट्टे यांनी छायाचित्रण केले, तर जोशना बनसोड यांनी आभार मानले.

‘जयंती २’ चित्रपटाचे प्रमोशन

                        कार्यक्रमाच्या सांगतेनंतर ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या शैलेश नरवाडे दिग्दर्शित ‘जयंती २’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी चित्रपटातील विशेष कलाकार किरण काशिनाथ, अक्षय खोब्रागडे यांच्यासह अन्य कलाकार उपस्थित होते. विजयकांत पाणबुडे यांनी चित्रपटाची माहिती दिली.

दाभोळकर हत्या प्रकरणाला गती देण्याची मागणी

यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने अनुप खांडे, निवासी उपजिल्हाधिकारी, नागपूर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील खटल्याला गती देऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.


डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात अभिवादन

दिवंगत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे चिरंजीव हमिद दाभोळकर, गायक अरुणभाऊ सहारे व अनिसचे पदाधिकारी
दिवंगत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे चिरंजीव हमिद दाभोळकर, गायक अरुणभाऊ सहारे व अनिसचे पदाधिकारी

नागपूर-कळमेश्वर अंनिस शाखेचे कार्याध्यक्ष शाहीर अरुणभाऊ सहारे यांची उपस्थिती

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष, शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विदर्भातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नागपूर-कळमेश्वर शाखेचे कार्याध्यक्ष व गायक शाहीर अरुणभाऊ सहारे उपस्थित होते.
२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली होती. ते सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
डॉ. दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी कार्यकर्ते त्यांच्या स्मृतीस्थळी एकत्र येऊन अभिवादन करतात. २० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात गायक शाहीर अरुणभाऊ सहारे, निर्भीड कार्यकर्त्या नंदिनी जाधव, डॉ. दाभोळकर यांच्या कन्या मुक्ता दाभोळकर यांच्यासह विविध कार्यकर्ते सहभागी झाले.
डॉ. दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकाची ज्योत तेवत ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना भावपूर्ण आदरांजली!

समाजासाठी संदेश

                      ”अंधश्रद्धेला विरोध करणे म्हणजे केवळ परंपरांना विरोध करणे नव्हे, तर समाजाला वैज्ञानिक विचार, विवेक आणि सत्याच्या दिशेने घेऊन जाणे होय. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी दाखविलेला विवेकवादी मार्ग प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकारून अंधश्रद्धा, अफवा आणि अज्ञानाविरोधात निर्भयपणे आवाज उठवावा. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्यांवर आधारित समाजनिर्मिती हीच डॉ. दाभोळकरांना खरी श्रद्धांजली ठरेल.”


 

 

0
0

Leave a Reply

Realted News