लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट! जुलैचा ₹1,500 हप्ता जमा होणार; ₹344.74 कोटींच्या निधीला मंजुरी

अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिलांना लाभ

1 कोटी 65 लाख महिलांच्या खात्यात आठवडाभरात DBTद्वारे पैसे जमा होणार

मुंबई | कामगार टाइम्स

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै 2026 महिन्याचा ₹1,500 हप्त्याचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थींसाठी ₹344.74 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट DBTद्वारे हप्ता जमा केला जाणार आहे. अर्जांची छाननी व पात्रता तपासल्यानंतरच लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

1 कोटी 65 लाख महिलांना लाभ

सध्या योजनेअंतर्गत 1 कोटी 65 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना जुलै महिन्याचा ₹1,500 हप्ता मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, येत्या आठवडाभरात लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये अनुसूचित जाती घटकासाठी या योजनेअंतर्गत ₹3,000 कोटींचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी जुलै महिन्याच्या लाभासाठी ₹344.74 कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

62 लाख महिलांची प्रतीक्षा कायम

दरम्यान, योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत आतापर्यंत 92.10 लाख महिला योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. तर तब्बल 62 लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या, स्मार्टफोनचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना ई-केवायसी पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे या महिलांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.

0
0

Leave a Reply

Realted News