सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप; “आमच्या संयमाला कमजोरी समजू नका”
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासह आंदोलनादरम्यान सरकारने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नसल्याचा आरोप करत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ने पुन्हा दिल्ली मार्चची घोषणा केली आहे. 5 सप्टेंबर रोजी हा निषेध मोर्चा काढण्यात येणार असून इंडिया गेटपासून सुरू होणारा मोर्चा नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत जाणार आहे.
NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेविरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी तसेच पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीयही या मोर्चात सहभागी होणार असल्याचे CJP ने सांगितले.

25 जुलैला आंदोलन घेतले होते मागे
NEET प्रकरणाच्या निषेधार्थ CJP ने 20 जूनपासून जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांच्या आधारे आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर 25 जुलै रोजी आंदोलन मागे घेण्यात आले होते.
मात्र, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पूर्ण झाले नसल्याचा दावा CJP ने केला आहे.
सर्व FIR ची यादी देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
CJP च्या म्हणण्यानुसार, 18 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या FIR ची संपूर्ण यादी मागितली होती.
पक्षाचा दावा आहे की, केंद्र सरकारने ही यादी देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलन मागे घेताना सरकारने दिलेल्या आश्वासनांपासून माघार घेतली जात असल्याचा आरोप CJP ने केला आहे.
“सर्व FIR मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार”

CJP नेते सौरव दास आणि रत्ना सिंह यांनी सरकारने आंदोलकांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवरील सर्व FIR मागे घ्याव्यात आणि शांततापूर्ण आंदोलकांवरील कारवाई थांबवावी, अशीही त्यांची भूमिका आहे.
“आमच्या संयमाला कमजोरी समजू नका,” असा इशाराही CJP कडून देण्यात आला आहे.
जयपूरमध्येही हिंसाचाराचा आरोप
दरम्यान, CJP च्या ‘शाळा दुरुस्त करा’ अभियानादरम्यान जयपूरमधील रामपुरा-कंवरपुरा गावात पक्ष कार्यकर्त्यांसोबत कथित हिंसाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांनी राजस्थान सरकारकडे या प्रकरणात कारवाई करण्याची आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र, CJP कार्यकर्त्यांविरुद्धही पुरावे आढळल्यास पक्ष कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“साभार दिव्य मराठी”









