मराठा आरक्षण : मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस

१२ सप्टेंबरला मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करण्याचा इशारा

अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची गर्दी वाढली; सरकारकडून तोडगा निघण्याकडे लक्ष

आंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, रात्री उशिरापर्यंत मराठा समाजाचे बांधव अंतरवाली सराटीत दाखल होत होते. अनेक आंदोलकांनी आंदोलनस्थळीच मुक्काम केला आहे.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन मुंबईत नेणार

सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असला, तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा मुंबईकडे वळवली जाईल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. १२ सप्टेंबरला मुंबईत धडक देण्याची तारीख जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

विखे पाटील पुन्हा मध्यस्थी करणार?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार आणि जरांगे यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा मध्यस्थी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वीही त्यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली होती.

जात पडताळणी समित्या रद्द करण्याची मागणी

महाराष्ट्रातील जात पडताळणी समित्याच रद्द करण्याची मागणीही जरांगे यांनी केली आहे. कुणबी नोंदींची अंमलबजावणी, प्रलंबित अर्ज निकाली काढणे, कुणबी प्रमाणपत्रांना जात वैधता देणे आणि हैदराबाद गॅझेटनुसार प्रक्रिया राबविण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, जात पडताळणी समित्या रद्द करण्याच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

पाच टप्प्यांत आंदोलनाचा इशारा

हे आंदोलन पाच टप्प्यांत होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. सरकारने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी त्यांची भूमिका आहे. मागण्या वेळेत मान्य न झाल्यास मुंबईतील आंदोलनासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होतील, असा इशारा आंदोलनाच्या समन्वयकांनी दिला आहे.


 

 

0
0

Leave a Reply

Realted News