खड्डे, अतिक्रमण आणि पार्किंगच्या विळख्यात कळमेश्वर; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त!

बाजारपेठेत रस्ते झाले अरुंद; अपघाताचा धोका वाढला, रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे कठीण

सतीश पांडे | प्रतिनिधी

कळमेश्वर : शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे, बाजारपेठेतील वाढते अतिक्रमण आणि रस्त्यांवर होणाऱ्या अनियंत्रित पार्किंगमुळे कळमेश्वर शहरातील वाहतूक व्यवस्था अक्षरशः विस्कळीत झाली आहे. बाजार चौक, रेस्टॉरंट परिसर, हॉस्पिटल परिसर, मोठे दुकान-मॉल, मोठे किराणा दुकान, बसस्थानकासमोरील टी-टर्निंग पॉईंट, मातापुरा मध्य रस्ता तसेच फुटपाथवरील दुकाने या भागांत वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली आहे.

खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत

शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.

अतिक्रमणामुळे रस्ते झाले अरुंद

बाजारपेठेतील काही दुकानांसमोर फलक, अलमारी, साहित्य व इतर वस्तू ठेवण्यात येत असल्याने रस्त्यालगतचे क्षेत्र व्यापले जात आहे. फुटपाथवरही दुकाने थाटली जात असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे.

अनियंत्रित पार्किंगचा वाहतुकीला फटका

दुकानांमध्ये येणारे ग्राहक आपली दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने उपलब्ध रस्त्याची रुंदी कमी होते. सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात आहे.

अत्यावश्यक सेवांनाही अडथळा

वाहतूक कोंडीचा सर्वाधिक गंभीर परिणाम आपत्कालीन सेवांवर होण्याची शक्यता आहे. रुग्णालय परिसरातील गर्दी आणि अरुंद झालेल्या रस्त्यांमुळे रुग्णवाहिका व अन्य अत्यावश्यक वाहनांना मार्ग काढणे कठीण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी

कळमेश्वर नगरपरिषद आणि वाहतूक विभागाने संयुक्तपणे पाहणी करून रस्त्यालगतचे अतिक्रमण तातडीने हटवावे, खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि बाजारपेठेत नियोजित पार्किंग व्यवस्था लागू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनाने या प्रश्नाकडे वेळीच गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात वाहतूक कोंडीसोबतच अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीत गंभीर परिणाम होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईलवर, थेट आपल्या गावातून

सतीश पांडे : 📲 9561480227


0
0

Leave a Reply

Realted News